ताडोबाच्या जंगलात 20 साग झाडांची अवैध कत्तल

0
16

विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर,दि.26- जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातील ताड़ोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात सागाची लाकडे कापून त्याची तस्करी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. ताडोबाच्या जंगलातील पळसगाव गावालगत वनकर्मचा-यांनी अवैध सागवान तोड आणि तस्करी चालविली असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे. या जंगलात २० हून अधिक सागवान वृक्ष कापून घेऊन गेल्याने वनविभाग हादरला आहे.
गभरातील वन्यजीवप्रेमींचे आवडते डेस्टिनेशन. पट्टेदार वाघ आणि हजारो वन्यजीव प्रजातींच्या संरक्षणासाठी वनविभागाने शेकडो कायदे निर्माण करत जंगलाशेजारी राहणा-या ग्रामस्थांना जंगलात जाण्यापासून परावृत्त केले आहे. परिणामी उत्तम नैसर्गिक अधिवास तयार झाल्याने या जंगलात वाघांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. मात्र हे सुखद चित्र वरवरचे असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. या जंगलातील पळसगाव गावालगत कक्ष क्र. १३१ मध्ये चक्क अवैध सागवान वृक्षतोड झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. १५ जून रोजी रात्री उशिरा ही झाडे तोडण्यात आले असून गावालगतच्या तलावाजवळ अवैध तोडीचे हे सागवान गुपचूपरित्या साठवून ठेवल्याचे ग्रामस्थांनी वनाधिका-यांच्या नजरेस आणून दिले. गावातील एक व्यक्ती यात सहभागी असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनाधिका-यांना दिली. टाळाटाळ करत अखेर अधिका-यांनी या व्यक्तीच्या घरी धाड घालून सागवान पाट्या देखील जप्त केल्या. या व्यक्तीला अटक देखील केली मात्र दुस-या दिवशी लगेच जामिनावर त्याची मुक्तता केली. या एवढ्या कारवाईनंतर वनविभाग आश्चर्यकारकरीत्या मौन झाला आहे.
बैलगाडीच्या सहाय्याने सागवान बाहेर काढायचे आणि रात्रीच्या अंधारात वणवा निरीक्षणाच्या वाहनातून सागवान ताडोबातून साळसूद बाहेर आणायचे असा हा प्रकार किती काळापासून सुरू आहे यावर ताडोबा गाभा क्षेत्रातील पळसगाव वनसमितीचे अध्यक्ष जय कुळमेथे,सदस्य ललिता मडावी, पुंडलिक मसराम – सदस्य आदी ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित करुन वनविभागावर शंका निर्माण केली आहे. दरम्यांन ताडोबाचे प्रमुख असलेले अधिकारी अशी घटना घडलीच नसल्याचा ठाम दावा प्रारंभी करत होते. मात्र घटनेचा तपशील दिल्यावर मात्र घटना फारशी गंभीर नाही आठवडाभरात चौकशी करतो असे सांगून टाळाटाळ करु लागल्याची माहिती सुत्रांनी दिली.