…अखेर इस्तारीच्या ‘त्या’ पुलाची चौकशी सुरू

0
16

साप्ताहिक ‘बेरारटाईम्सच्या’ वृत्ताने प्रशासन खडबडून जागे झाले

गोंदिया- देवरी तालुक्यातील नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागातील ईस्तारी ग्रामपंचायतीच्या वतीने गाढवी नदीच्या नाल्यावर 22 लाख खर्चून बांधण्यात आलेला पूल पहिल्याच पावसात वाहून गेले. सदर पुलाचे बांधकाम हे मग्रारोहयो अंतर्गत करण्यात आल्याचे समोर आल्याने जिल्ह्यातील प्रशासन खडबडून जागे झाले. साप्ताहिक बेरारटाईम्सच्या अंकात बातमी प्रकाशित होताच सदर पुल बांधकामाच्या चौकशीला वेग आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, देवरी तालुक्यातील ईस्तारी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या हेरपार-गुजुरबडगा या रस्त्यावरील बांधकामाचे नियोजन मग्रारोहयो अंतर्गत करण्यात आले होते. या बांधकामासाठी या योजनेतून तब्बल 22 लाखाचा निधी सुद्धा उपलब्ध करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे गाढवी नदीवर असलेल्या या नाल्याला पावसाच्या पाण्याच्या प्रचंड ओघ असतो. असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही सल्ला वा मा्र्गदर्शन घेण्यात आला नसल्याचे सांगण्यात येते. मग्रारोहयो अंतर्गत एवढ्या मोठ्या निधीतून पूलाचे बांधकाम करीत असताना अंदाजपत्रक तयार करण्यापासून तर तांत्रिक मंजूरी प्रदान करण्यापर्यंत सर्वांनीच डोळेझाक केल्याची बाब समोर आली आहे. अगदी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांपासून तर बांधकाम विभागातील सर्वच अधिकाऱ्यांनी हे प्रकरण समोर येताच तोंडावर हात ठेवत मग्रारोहयोतून काम झालेच कसे असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे ज्या कनिष्ठ अभियंत्याने या कामाचे अंदाजपत्रक तयार केले, त्या अभियंत्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांजवळ लाबींग केल्याची चर्चा पंचायत समिती वर्तुळात आहे. दरम्यान, या बांधकामाचे भूमिपूजन जानेवारी महिन्यात करण्यात आले होते. या कामाचे कंत्राट देवरीचे अशोक राऊत नामक कोण्या कंत्राटदारास दिल्याचे तत्कालीन ग्रामसेवक जी.डी. चारथळ यांनी बेरारटाईम्सशी बोलताना सांगितले. संबंधित कंत्राटदाराने ग्रामसेवकाला हाताशी धरून चार महिन्यात या पूलाचे बांधकाम पूर्ण केले. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या ग्रामसेवकाची सविस्तर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी इस्तारीवासियांनी केली आहे.
या प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशीला प्रारंभ केला असून देवरीच्या गटविकास अधिकाऱ्यांना या विषयी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालावर जिल्हा परिषद प्रशासनाने नाराजी व्यक्त करीत सविस्तर अहवाल मागितल्याचे कळते. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास अनेक कर्मचारी-अधिकारी गोत्यात येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, देवरीचे प्रभारी गटविकास अधिकारी डॉ. व्ही.पी. कोडेकर, विस्तार अधिकारी बडोले आणि शाखा अभियंत्यासह काही अधिकाऱ्यांनी सदर बांधकामास भेट दिल्याची माहिती आहे.

चौकशी करून वरिष्ठांना अहवाल पाठवणार- डॉ. कोडेकर, प्रभारी गटविकास अधिकारी, देवरी

इस्तारी ग्रामपंचायतीच्या वतीने हेरपार- गुजुरबडगा रस्त्यावर तयार केलेला पूल वाहून गेलेल्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. उद्या संबंधितांनी देवरी येथे माहितीसह बोलाविले आहे. मी नुकताच गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला असल्याने अधिक माहिती उपलब्ध नाही. पूल वाहून गेल्याने सदर बांधकामाचा दर्जा मात्र सुमार असल्याचे त्यांनी मान्य करीत वरिष्ठांना सविस्तर अहवाल पाठवणार असल्याचे सांगितले.