सेवाग्राम विकास नियंत्रण आराखड्यास तत्वत: मंजूरी – मुख्यमंत्री

0
11

मुंबई, दि. 7 : महात्मा गांधी यांच्या जयंतीस 2 ऑक्टोबर, 2019 रोजी दीडशे
वर्षे पूर्ण होत असल्याने तयार करण्यात आलेल्या 266.53 कोटी रुपयांच्या
सेवाग्राम विकास आराखड्यास राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत तत्वत:
मंजूरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली
आहे.

सेवाग्राम विकास आराखड्याबाबत येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय शिखर समितीची बैठक
संपन्न झाली. बैठकीस वित्तमंत्री तथा वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर
मुनगंटीवार, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार रामदास तडस, आमदार
डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अपर मुख्य सचिव डी. के.
जैन, सुनील पोरवाल, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, महसूल विभागाचे
प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलींद म्हैसकर,
पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त
अनुपकुमार, वर्ध्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवल, वर्धा जिल्हा परिषदेचे
उपाध्यक्ष विलास कांबळे, सेवाग्राम आश्रमाचे विश्वस्त आदि उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विकासाचा कोणताही प्रकल्प
तयार करतांना तो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याची पुढील देखभाल व
दुरुस्तीची जबाबदारी कोणाची असेल या बाबींचाही प्रकल्पात समावेश करावा.
जेणेकरुन या विकास कामांचा जनतेस लाभ होईल अन्यथा विकासकामे केली जातात
परंतु त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी निश्चित नसल्याने चांगल्या
कामाचाही जनतेस लाभ होत नाही.

सेवाग्राम विकास आराखड्याचे चार टप्पे करण्यात आले असून प्रथम टप्प्यात
सेवाग्राम आश्रम व परिसराचा विकास करण्यात येणार असून यासाठी 42.79
कोटींचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ‘गांधी
फॉर टूमारो’ अंतर्गत गांधी संसाधन व प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात येणार
असून यासाठी 113.67 कोटीं रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.
या अंतर्गत स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन व प्रशिक्षण देणार केंद्र
उभारण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात सेवाग्राम, वर्धा आणि पवनार
परिसरातील वारसा पर्यटन : हेरिटेज ट्रेल अंतर्गत विविध वारसास्थळांना
जोडणारे मार्ग, शहर आराखड्यात सुधारणा, स्थानिक व पर्यटकांसाठी
करमणुकीच्या सुविधेसह सार्वजनिक केंद्र तयार करण्याबाबत 35.61 कोटी
रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. चौथ्या व अंतिम टप्प्यात
पर्यावरणीय प्रकल्पात पवनार येथील धाम नदीचे पुनरुज्जीवन व पवनार आश्रम
येथील नदी घाटांचा विकास करण्यात येणार असून यासाठी 42.65 कोटी रुपयांचा
प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. तसेच पायाभूत सुविधांच्या
विकासासाठी 14.77 कोटी रुपये, हेरिटेज पर्यटन विकासासाठी नागरी सुविधा
उपलब्ध करुन देण्यासाठी 4.40 कोटी रुपये, तर ‘गांधी फॉर टूमारो’ करिता
जमीन खरेदीसाठी 4 कोटी रुपये याप्रमाणे एकूण 266.65 कोटी रुपयांचा
प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.

सेवाग्राम विकास आराखड्यासाठी सन 2016-17 या वित्तीय वर्षात 50 कोटी
रुपयांचा नियतव्यय ठेवण्यात आला आहे. त्यापैकी 25 कोटी रुपयांचा निधी
अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. या निधीमधून विकासाची कामे करतांना प्रथम
पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात यावा तसेच याठिकाणी
येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेलाही या आराखड्यात प्राधान्य देण्यात यावे
त्याचबरोबर ही कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे,
असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.