सहकाराच्या माध्यमातूनच कृषी अर्थ व्यवस्थेला चालना- उपराष्ट्रपती हामिद अंसारी

0
11

नागपूर नागरिक सहकारी बँकेचा 55 वा स्थापना दिवस

नागपूर नगरीतर्फे उपराष्ट्रपतींचे भावपूर्ण स्वागत

नागपूर, दि. 8 : कृषी व ग्रामीण विकासामध्ये सहकारी संस्थांचे
बहुमुल्य योगदान आहे. सहकारी क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी व जागतिक
अर्थव्यवस्थेत आपले स्थान बळकट करण्यासाठी आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
करताना उत्पादक ते उपभोक्ता ही साखळी मजबूत करण्याचे कार्य सहकारी संस्था
करु शकते असे प्रतिपादन उपराष्ट्रपती मो. हामिद अंसारी यांनी व्यक्त
केले.डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या
55व्या स्थापना दिवस समारोहाचे उद्घाटन उपराष्ट्रपती यांच्या हस्ते
त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ व जलवाहतूक
मंत्री नितीन गडकरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय
गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ऊर्जा मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर
बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, बँकेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे,
उपाध्यक्ष राजेश लखोटिया व्यासपीठावर उपस्थित होते.
देशातील सहकारी क्षेत्राचा इतिहास 112 वर्षापासूनचा असून
सातत्याने कर्जामध्ये असलेल्या शेतकऱ्यांना व त्यांना गरिबीतून बाहेर
काढण्यासाठी 1904 मध्ये सहकारी अधिनियम तयार करण्यासाठी शासनाने पुढाकार
घेतला. सहकाराच्या माध्यमातून समान आणि आर्थिक विकास हे धोरण समोर ठेऊन
देशामध्ये त्याची अंमलबजावणी करताना पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी एक गाव
एक पंचायत व एक सहकारी समिती व एक विद्यालय ही संकल्पना समोर ठेवली होती.
जगामध्ये भारतातील सहकार आंदोलन सर्वात मोठे असून बँकींग, साखर उद्योग,
पणन, हस्तकला, ग्राहकोपयोगी वस्तू तसेच कृषी क्षेत्राशी संलग्न अशा सर्वच
क्षेत्रामध्ये 24 कोटीपेक्षा जास्त सदस्य कार्यरत असून 73 हजार कोटी
रुपयाचे भागभांडवलाची गुंतवणूक असल्याचेही उपराष्ट्रपतींनी यावेळी
सांगितले.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की,
शेतकरी व समाजातील गरीब कुटुंबियांचे जीवनमान बदलविण्याचे काम सहकारी
क्षेत्रातील बँकांनी केले आहे. तसेच आर्थिक परिवर्तनासाठी सहकारी
बँकांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे.
प्रारंभी नागपूर महानगरपालिकेतर्फे महापौर प्रवीण दटके तसेच
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नागपूर नगरवासींयातर्फे उपराष्ट्रपती मो.
हामिद अंसारी यांचा स्मृतीचिन्ह, भेट वस्तू तसेच शाल श्रीफळ देऊन गौरव
केला. यावेळी सुधीर राऊत, दयाशंकर तिवारी, विकास ठाकरे आदी उपस्थित होते.
नागपूर नागरिक बँकेचे अध्यक्ष प्रा.संजय भेंडे यांनी प्रमुख
पाहुण्यांचे स्वागत करुन प्रास्ताविकात सहकारी बँकेच्या 55 वर्षाचा
प्रगतीचा आढावा सांगितला. कार्यक्रमाचे संचलन महेश तिवारी यांनी तर आभार
प्रदर्शन उपाध्यक्ष राजेश लखोटिया यांनी मानले.