गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला

0
11

गडचिरोली,दि.१०: गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात संततधार पाऊस पडत असल्याने अनेक मार्ग बंद असून, शेकडो गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. दरम्यान संजय सरोवर व गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.जिल्ह्यातील १२ पैकी ७ तालुक्यांत अतिवृष्टी झालेली आहे. आज दुपारी ४ वाजता गोसीखुर्द धरणाचे १७ दरवाजे अर्धा मीटरने, तर १६ दरवाजे १ मीटरने सुरु करण्यात आले असून ३१७७ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. काल रात्री कढोली येथील नाल्यावर दोन जणांना पुरातून वाचवण्यात उपविभागीय अधिकारी गंगारात तळपाडे यांच्या नेतृत्वात प्रशासनाला यश आले. दिना नदीच्या पुलावर बोरी नजीक पाण्याची पातळी चढत आहे.

गेल्या चोवीस तासांत भामरागड तालुक्यात सर्वाधिक ३०० मिलिमीटर नोंद झाली. त्याखालोखाल अहेरी येथे २६२.६ मिलिमीटर पाऊस पडला. संततधार पावसामुळे काल भामरागडनजीकच्या पर्लकोटा तसेच बांडिया नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागले होते. पूर अजूनही जैसे थे असून, भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. पुरामुळे त्या भागातील शंभर गावांचा संपर्क अद्यापही तुटलेलाच आहे. भामरागड तालुक्यातील वीजपुरवठाही खंडित असून, मोबाईल व दूरध्वनी सेवा पूर्णपणे ठप्प आहे. अहेरीनजीकच्या गडअहेरी नाल्याच्या पुलावर पाणी असून, वाहतूक ठप्प आहे. आरमोरी तालुक्यातील कमी उंचीच्या वैलोचना नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने वैरागड-देलनवाडी मार्ग अद्यापही बंद आहे, वांगेपल्ली व गडअहेरी येथील प्राणहिता नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. सिरोंचा तालुक्यातील अंकिसा-असरअली मार्गावरील येर्रावागू नाल्यावर पाणी असल्याने हा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे ३२ गावांचा संपर्क तुटला आहे. आज पहाटे अडीच वाजता गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण ३३ दरवाजे दीड मीटरने सुरु करुन ९०५७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यानंतर सकाळी साडेसहा वाजता ९ दरवाजे दीड मीटरने, तर २४ दरवाजे एक मीटरने सुरु करण्यात आले. त्यातून ६९३९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. संजय सरोवरातून पाणी सोडण्यात आले असून, संजय सरोवर ते गोसेखुर्द प्रकल्पापर्यंत पाणी येण्यास ५० तासांचा कालावधी लागतो. गोसेखुर्द प्रकल्पातून गडचिरोलीपर्यंत पाणी येण्यास १९ तास लागतात. त्यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता असून, नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे यांनी केले आहे.

मौशीखांब-वडधा नाल्यावरुन १ फुट पाणी वाहत असल्याने जड वाहतूक तुर्तास बंद आहे. कसनसूर-एटापल्ली मार्गावरील झुरी नाल्यावर पाणी चढल्याने वाहतूक बंद आहे.
एटापल्ली-गट्टा रस्त्यावरील सुरजागड नाल्यावरुन पाणी वाहत असल्याने शिवाय डायव्हर्शननवरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद आहे. तथापि एटापल्ली-गट्टा रस्त्यावरील बांडिया नदीचे पाणी पुलावर आल्याने वाहतूक ठप्प आहे. गडचिरोली-साखेरा-पेंढरी-बोटेहुर या मार्गावरील बांडिया नदीचे व झाडापापडा नाल्यावरील पाणी पुलावर आल्याने आज दुपारपर्यंत वाहतूक बंद होती. मुस्का-तळेगाव या मार्गावरील वाहतूकही ठप्प आहे.
प्राणहिता नदीची पातळी वाढत असून, महागाव गेर्रा येथील प्रकल्पाने इशारा पातळी १२१.५०० मीटर ओलांडून १२४.२० मीटर पातळी गाठली आहे. तेथून २२६७५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज सायंकाळी ६.३० वाजता गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे अर्धा मीटरने सुरु आहेत. तेथून ३१७७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.