कारेमोरे विरुध्द नागो गाणारांत रंगणार शिक्षक मतदारसंघाची निवडणूक

0
13

भंडारा,दि.10-नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या नोव्हेंबर मध्ये होऊ घातली आहे.भाजप समर्थित नागो गाणार यांचाविरुद्ध आनंदराव कारेमोरे हे रिंगणात उतरणार हे रविवारला नागपूर येथील आमदार निवासात झालेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या बैठकित जवळपास निश्चित झाले आहे.माजी आमदार डायगव्हाणे यांनी आपण लढणार नसून सक्षम उमेदवार देऊन विजयी करु अशा विश्वास दाखविल्यानंतर कार्यकारिणीने निवडणुकीच्या पध्दतीतून उमेदवाराची निवड करुन आनंदराव कारेमोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे आनंदराव कारेमोरे यांचीनिवड करण्यात आली. संघटनेच्या झालेल्या निवडणुकीत कारेमोरे यांना सर्वाधिक मते पडली. भारतीय जनता पार्टी सर्मथित शिक्षक परिषदेने विद्यमान आमदार नागो गाणार यांना पुन्हा संधी दिली आहे. विदर्भात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ अतिशय जुनी संघटना असून, संघटनेचे २० हजारावर सदस्य आहेत. शिवाय सलग तीन टर्म संघटनेचे विश्‍वनाथ डायगव्हाणे यांनी नागपूर शिक्षक मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. नागपूर मतदार संघाचा इतिहास लक्षात घेता, शिक्षक परिषद व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ या दोघांमध्येच खरी लढत असते. यावेळी गाणारांना संघटनेतील बंडखोरांबरोबरच कारेमोरे यांचे आव्हान राहणार आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघामध्ये आनंदराव कारेमोरे यांच्यासह सुधाकर अडबले यांनीही उमेदवारीसाठी दावा केला होता. त्यामुळे उमेदवार निश्‍चित करण्यासाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रांतीय कार्यकारिणीचे सदस्य व विदर्भातील सर्व जिल्ह्यातील सचिव, माजी आमदार विश्‍वनाथ डायगव्हाणे अशा २३ मतदारांनी दोघांनाही मतदान केले. आमदार निवासमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आनंदराव कारेमोरे यांना १५ व सुधाकर अडबले यांना ८ मते पडली. कारेमोरे यांना उमेदवार घोषित करण्यात आल्याची माहिती महेंद्र बढे यांनी दिली.