यशोदा कंपनीच्या आॅर्गनायझरने दिली जिल्हा गुणवत्ता नियंत्रकाला धमकी

0
12

भंडारा/गोंदिया, दि. 11-गोंदिया-भंडारा जिल्ह्यात उत्कृष्ठ वाणाचे धान बियाणे म्हणून आतापर्यंत बोगस बियाण्याची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील यशोदा कंपनीविरुध्द शेतकरी वर्गात चांगलाच रोष आहे.गोंदिया -भंडारा जिल्ह्यात हजारो क्विंटल धान बियाणे शेतकर्यांनी परत केले.गोंदिया जिल्ह्यातही मोठ्याप्रमाणात बियाणे परत झाले. परंतु भंडारा जिल्ह्यातील कृषी अधिकार्यांनी शेतकरी हित प्राधान्य देत कंपनीविरुध्द पावले उचलण्यास सुरवात करुन बोगस बियाण्यांची नोंद घेण्यास सुरवात केली होती.त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील मे.यशोदा हायब्रीड सीडस उत्पादक कंपनीच्या आॅर्गनायझरने थेट कृषी अधिकाऱ्यांनाच धमक्या देणे सुरू केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.सविस्तर असे की, भंडारा येथील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुप्रिया कावळे यानी कारवाईचे धाडस दाखविल्याने हा बोगस कारभार समोर आला.त्यांनी कंपनीच्या बोगस बियाणांची माहिती गोळा करण्यास सुरवात केल्यानेच त्यांना धमकी देण्याचा प्रकार घडला.सदर प्रकरणात आपणास धमकी दिली जात असल्याची लेखी तक्रार जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक सुप्रिया कावळे यांनी आज सोमवार(दि.11)ला नागपुरातील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे केली आहे. त्या तक्रारीमध्ये हिंगणघाट येथील मे. यशोदा हायब्रीड सीडस् कंपनीचे आॅर्गनायझर आनंद तळेकर रा. मांगली, ता. पवनी असे त्या धमकी देणाऱ्या आॅर्गनायझरचे नाव स्पष्ठ करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातही अशा प्रकार मोठा असताना येथील अधिकारी मात्र मुग गिळून बसले आहेत.तत्कालीन नियंत्रक यादव ठाकूर यांच्या कार्याकाळात झालेल्या कारवाई वगळता गेल्या दोन वर्षात गोंदिया जिल्ह्यात एकही कारवाई न होण्यामागे कृषी अधिकारी यांच्या भूमिकेबद्दल शंकांना उधाण आणणारे ठरले आहे. श्रीमती कावळे यांच्या मते, त्या मागील २४ जून २०१६ रोजी बियाणे तक्रारीच्या चौकशीसाठी आनंद तळेकर यांच्याकडे गेल्या होत्या. दरम्यान, तळेकर यांनी आपण हिंगणघाट येथील यशोदा सीडस् कंपनीचा आॅर्गनायझर असून, कंपनीसाठी सीडस् प्रोग्राम राबवीत असल्याचे सांगितले. त्यावर कावळे यांनी सीडस् प्रॉडक्शन प्रोग्रामबद्दल सविस्तर माहिती लिहून घेतली. यानंतर ९ जुलै २०१६ रोजी कावळे यांना एका मोबाईलवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपण आनंद तळेकर बोलत असल्याचे सांगितले. शिवाय तुम्ही जर माझे जीवन खराब केले, तर मी सुद्धा तुमचे जीवन खराब करून टाकीन. मी तुमच्याबद्दल सगळी माहिती काढली आहे. तुम्ही कसे काम करता, ते मी पाहतो. मी तुम्हाला जगू देणार नाही. तुम्ही कुणाच्या पत्नी आहात, ही सुद्धा मी माहिती काढली आहे. मला तुम्ही लिहून नेलेल्या माहितीची ओसी द्या, अशा शब्दात तळेकर यांनी थेट कावळे यांना धमकी दिली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने गंभीर दखल घेऊन, लगेच पुणे येथील कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक (नि. व गु. नि.) यांना माहिती कळवून मे. यशोदा सीडस् कंपनीविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. त्याचवेळी या धमकीने संपूर्ण कृषी विभागात खळबळ माजली आहे.