भूताच्या अपवेने विद्यार्थ्यांनी सोडले वसतिगृह

0
9

चंद्रपूर,दि.15- जिल्ह्यातील राजुरा येथील वसतीगृहात भूत असल्याच्या अफवेमुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. हा प्रकार चिंचोली येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात घडला असून, यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे चित्र आहे. एक एक करून वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांनी आपले सामान घेत घराकडे पलायन केले आहे. यामुळे संपूर्ण वसतिगृहच ओसाड झाले आहे. आतापर्यंत १२५ विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडले.
राजुरा तालुक्यातील चिंचोली येथे सावित्रीबाई फुले मुला-मुलींचे वसतिगृह आहे. या ठिकाणी जवळपास १५० ते १६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. येथील विद्यार्थी हे गडचिरोली जिल्ह्यातील लांबळपल्ली, पेंटीपाका, गुमलाकोंडा, राजनापल्ली, सोमनूर, मयगणपट्टा, गोरमपल्ली आदी गावांतील राहणारे आहेत. गेल्या काही दिवसांपासून येथील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. वसतिगृहात रात्रीच्या वेळेला घुंगराचा आवाज येणे, खोलीचे दार आपोआप हलणे, खिडकीत मानवी प्रतिकृती दिसणे, विजेचा प्रवाह बंद असताना पंखा फिरायला लागणे, रात्रीला रडल्याचा आवाज येत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी थेट आपल्या पालकांना संपर्क करून बोलावून घेतले. त्यांनी वसतिगृहातील प्रकाराची वाच्यता करीत आम्हाला इथे राहायचे नसल्याचे सांगत घरी परतण्यासाठी आग्रह केला. या अफवेची लागण पालकांनाही झाल्यामुळे त्यांनी त्यांचे सामान घेत घराकडे प्रयाण करण्याचा निर्णय घेतला. बसस्थानक परिसरात घोळक्याने पालक आपल्या मुलांना सामानासह घेऊन जात असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
विद्यार्थ्यांकडून भुताची अफवा पसरविली जात आहे. मात्र, वसतिगृहात असा कुठलाही प्रकार घडला नाही. मागील चार दिवसांपासून वीज नसल्याने पाण्याची समस्या होती. तीही दूर करण्यात आली. विद्यार्थी वसतिगृह सोडून जाण्यामागे भूताचं कारण देत आहेत. मात्र चिकन आणि मटन बिर्याणीसाठी विद्यार्थ्यांनी भूताचा बळी दिल्याचं वसतिगृहाच्या संचालकांनी म्हटलं आहे.