मुनगंटीवाराच्या हस्ते ब्रम्हपूरी नगरपालिका इमारतीचे भूमीपूजन

0
10

ब्रम्हपूरी,दि.15-आषाढी एकादशीला नगर परिषद इमारतीचे भूमीपूजन होत आहे. त्यामुळे दगड-सिमेंट आणि लोखंडाची इमारत उभी न करता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विठ्ठल मानून सेवा देणारी लोकांची आपली इमारत उभारा, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ब्रम्हपुरी नगर परिषदेच्या प्रस्तावित प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन आज मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कीर्तीकुमार भांगडिया, नगराध्यक्षा रिता उराडे, मुख्यधिकारी मंगेश खवले, माजी आमदार अतुल देशकर आदी उपस्थित होते.

ही इमारत बांधण्यासाठी 3 कोटी रूपये शासनाने दिले आहेत. इमारत बांधण्यासाठी 10 कोटी लागणार आहे. आपली गरज लक्षात घेऊन उर्वरित 7 कोटीचं काय तर गरज भासल्यास अधिक रक्कम आपण देऊ असे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

शहरात 19 मोठे रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत बांधण्यात येणार आहेत. या बाबतच्या प्रस्तावाचा विचार करण्यासाठी बैठक घ्यावी, अशी सूचना देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले की, शहरात असणारी इको-पार्कची मागणी मान्य करण्यात आली आहे. यासाठी दोन दिवसात निधी आपणास दिला जाईल. या पावसाळ्यातच पार्कची उभारणी सुरु करा, असेही मुनगंटीवार म्हणाले.शहरात कोट तलावाचे सौंदर्यीकरण व संवर्धन याबाबत देखील शासन मागे राहणार नाही. नगर परिषदेने काम करताना सर्वच बाबतीत केवळ ब्रम्हपुरीच नव्हे तर चंद्रपूर जिल्हा आघाडीवर यावा याचा प्रयत्न आपण या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.

श्री. मुनगंटीवार हे दिलेल्या शब्दाला पूर्ण करतात याची प्रचिती आपणास वारंवार येते असा अनुभव अध्यक्षस्थानावरुन बोलताना खासदार नेते यांनी सांगितला. 2 कोटी वृक्ष लागवड यशस्वी करुन दाखवला याबद्दल सुधीर मुनगंटीवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले याचाही उल्लेख नेते यांनी आपल्या भाषणात केला.

वित्त व नियोजन मंत्री व पालकमंत्री या भूमिकेतून मुनगंटीवार यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे होत आहेत. शहराच्या विकासासाठी 5 कोटी मिळाले, असे नगराध्यक्षा रिता उराडे यांनी प्रारंभी भाषणात सांगितले. मुख्याधिकारी खवले यांनी प्रास्ताविकात शहरात प्रस्तावित असणाऱ्या कामाबद्दल माहिती दिली. शेवटी आरोग्य निरीक्षक ठोंबरे यांनी आभार मानले.