छोट्या कुटुंबातूनच सुखाची प्राप्ती- उषा मेंढे

0
12

जागतिक लोकसंख्या दिवस साजरा
गोंदिया,दि.१६ : वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक प्रश्न आज निर्माण झाले आहे. अनेक कुटुंब त्यांच्या मुलभूत गरजा सुध्दा पूर्ण करु शकत नाही. कुटुंब छोटे असेल तर सुखाची प्राप्ती होण्यास मदत होते. असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.जिल्हा परिषद सभागृहात जागतिक लोकसंख्या दिन तसेच सुरक्षीत मातृत्व दिन कार्यक्रमाचे औचित्य साधून अध्यक्षस्थानावरु श्रीमती मेंढे बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, समाजकल्याण समिती सभापती देवराज वडगाये, महिला व बालकल्याण समिती सभापती विमल नागपूरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राज गहलोत, गोंदिया पं.स.सभापती स्नेहा गौतम, आमगाव पं.स.सभापती हेमलता डोये, जि.प.सदस्य सर्वश्री शेखर पटले, विजय लोणारे, ज्योति वालदे, उषा शहारे, सिमा मडावी, गोरेगाव माजी पं.स.सभापती आरती चव्हाण, माजी पं.स.सदस्य मंगला पाखमोडे, आशा अगळे यांची उपस्थिती होती.
श्रीमती मेंढे पुढे म्हणाल्या, लोकसंख्या नियंत्रणासाठी तात्पुरते उपाय म्हणून निरोध, कॉपर-टी, तर स्थायी उपाय म्हणून पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया इत्यादी साधनांचा अवलंब करावा असेही त्या म्हणाल्या.डॉ.पुलकुंडवार म्हणाले, मुलीच्या जन्माचे स्वागत करावे. मुलगा व मुलगी असा भेदभाव न करता मुलगी हीच खरी वंशाचा दिवा आहे असे समजावे. कारण मुलगी दोन्ही घरी प्रकाश देते. जुने, पारंपारीक व भुरसटलेले विचार त्यागून मुलांचा अट्टाहास सोडून बेटी बचाव बेटी पढाओ ही संकल्पना स्वीकारावी. पीसीपीएनडीटी ॲक्टनुसार गर्भलिंग निदान करणाऱ्या दोषी व्यक्तींवर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविकातून डॉ.गहलोत यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या सर्व उपाययोजना तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी उपलब्ध साधने याबाबतची माहिती दिली. पुरुष नसबंदी केल्यास १४५१ रुपये व स्त्री नसबंदी केल्यास ६०० रुपये मोबदला. तर इतर लाभार्थ्यांना २५० रुपये मोबदला देण्यात येते. सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेअंतर्गत दोन मुली किंवा एका मुलीवर शस्त्रक्रिया केल्यास २ हजार रुपये रोख लाभार्थ्याच्या थेट खात्यात व ८ हजार रुपयाचे बचत प्रमाणपत्र देण्यात येते.
यावेळी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, स्वयंसेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सहायक, औषध निर्माण अधिकारी यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी डॉ.विनोद चव्हाण, डॉ.चौरागडे यांचेसह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.मीना वट्टी यांनी केले, उपस्थितांचे आभार साथरोग अधिकारी बी.आर.पटले यांनी मानले.