आश्रमशाळा संस्थाचालकाची इलेक्ट्रानिक्स मिडियाच्या पत्रकारांना मारहाण

0
9

नागपूर,दि.18- शिक्षण संस्थेत सुरु असलेल्या गैरव्यवहाराची बातमी करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांवर संस्थाचालकांनी आज सोमवारला हल्ला करुन मारहाण केल्याची घटना हिंगणा येथील अहिल्यादेवी होळकर आश्रम शाळेत घडला.हिंगणा येथील अहिल्यादेवी होळकर आश्रम शाळेत अनेक घोटाळे असल्याच्या तक्रारी होत्या.याच विषयावर बातमी करण्यासाठी महाराष्ट्र १ न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी गजानन उमाटे व कॅमेरामन सौरभ होले,आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधी सुरभी शिरपूरकर,कॅमेरामन प्रशांत मोहिते व सुनील लोंढे यांना आज धक्कामुक्की करून मारहाण करण्यात आली तसेच त्यांची गाडी जाळण्याची धमकीही देण्यात आली.या संस्थेत खोटी पटसंख्या दाखवून अनुदान लाटले जात असून अनेक गैरप्रकार सुरु असल्याचेही सांगितले जात होते.या सर्व आरोपांची शहानिशा कऱण्यासाठी संस्थेत गेले असता तेथे संस्थाचालक श्रीकृष्ण मते आणि त्यांच्या मुलांसह काही कर्मचार्‍यांनी पत्रकारांवर हल्ला करीत त्यांना मारहाण केली.
महिला पत्रकारही या मारहाणीतून सुटल्या नाहीत.या सर्व घटनेचे विडीओ रेकॉर्डिंग देखील संबंधित पत्रकारांजवळ आहे.घटनेनंतर पिडीत पत्रकारांनी हिंगणा पोलीस स्टेशन गाठले असून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याच्या तयारीत आहेत.तसेच संस्थाचालक देखील आपल्या समर्थकांसह पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित आहेत. या घटनेमुळे प्रसार माध्यमामध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपी संस्थाचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.