जखमी बिबट्या शिरला इंदोरा गावातील घरात

0
12

गोंदिया,दि.20- तिरोडा तालुक्यातील इंदोरा गावात एक जखमी बिबट्या घरात घुसल्याने गावात एकच खडबळ उडाली. नवेगाव-नागझिरा अभ्यारण्याच्या बफरझोन कोर परिसराला लागून इंदोरा हे गाव आहे.
काल बुधवारी उशिरा मध्यरात्रीच्या सुमारास इंदोरा गावातीलं प्रभाकर ढोमणे यांच्या घरात एक जखमी बिबट्या घुसला. प्रभाकर ढोमणे यांची पत्नी आपले दैनंदिन कामकाज करण्याकरीता सकाळी स्वयंपाक खोलीत गेली असता त्यांना अंदाजे एक वर्षीय वयाचा बिबट्या चुलीजवळ बसला दिसला. यांची माहिती प्रभाकर यांच्या पत्नीने घरच्या लोकांना दिली असून गावात खडबळ उडाली गावक-यांनी लाकडी दांडयाच्या सहाय्याने बिबट्याला पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्या जखमी अवस्थेत असल्याने त्याला पळविण्यात गावक-यांना यश आले नाही. याची माहिती गावक-यांनी वन विभागाला दिली. वनाधिका-यांनी काही वन्यजीव प्रेमींसह घटनास्थळ गाठून तब्बल तीन तास रेस्क्यू आॅपरेषन राबविले. शर्तीच्या प्रयत्ना नंतर बिबट्याला जेर बंद करण्यात यश आले. मात्र, बिबट्या जखमी असल्याने त्याला प्राथमिक उपचाराकरीत पशु चिकित्सालयात तिरोडा येथे नेण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जंगलात आपल्या पेक्षा बलाढय अशा दोन वन्यजीवांच्या झुंजीत हा बिबट्या जखमी होऊन त्या वन्यजीवाच्या भीतीपोटी मानवी वसाहतीत आला असल्याचा अंदाज वन अधिका-यांनी व्यक्त केला आहे. सदर बिबटया पूर्णपणे तंदुरूस्त झाल्यानंतरच त्याला नवेगाव-नागझिराच्या जंगलात सोडण्यात येणार असल्याचे तिरोडा चे वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी एन.एच.शेंडे यांनी सांगितले. गोंदिया वनविभागाचे उपवनसंरक्षक व गोंदिया वन्यजीव विभागाचे तिरोडा येथील वनपरिक्षेत्राधिकारी एन.एच.शेंडे व त्यांच्या चमूनी मिळून हे रेस्क्यु आॅपरेषन पूर्ण केले. दरम्यान, या घटनेमुळे इंदौरा गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.