…अखेर चिचगड येथील वैद्यकीय अधिकारी निलंबित

0
10

Barar Logoबेरार इम्पॅक्ट
‘ढास पर्यटन‘प्रकरण भोवले

गोंदिया,दि.20- चिचगड ग्रामीण रुग्णालयाला दिलेली १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका ही आरोग्य सेवेला डावलून एका बनावट रुग्णाच्या नावावर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने परस्पर नजीकच्या ढास या पर्यटनस्थळी पिकनिकसाठी घेऊन गेल्याचे प्रकरण गेल्या १० तारखेला साप्ताहिक बेरार टाईम्सने उजेडात आणले होते. या प्रकरणी त्या रुग्णवाहिकेचे प्रभारी असलेले डॉ. जितेश वालदे या वैद्यकीय अधिकाऱ्याला आरोग्य विभागाने निलंबित केले आहे.
दरम्यान 108 या रुग्णवाहिकेचे नियंत्रण असलेल्या पुणे येथील बीआरजीच्या मुख्य कार्यालयातून डाॅ.ज्योत्सना माने यांनी बेरार टाईम्सला संपर्क करुन त्यांनी आधी चुकीचे वृत्त असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.परंतु बेरार टाईम्सने जेव्हा त्यांना घटनास्थळावरील व्हीडीओग्राफीचे छायाचित्र पाठविले तेव्हा त्यांनाही काहीतरी चुकीचे घडल्याचे मान्य करावे लागले.याप्रकरणी वालदे यांना निलंबित करण्यात येईल असे डाॅ.माने यांनी सांगितले होते.
सविस्तर असे की, अपघात वा अति निकडीच्या वेळी रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत पुरविता यावी, या उदात्त हेतूने आघाडी सरकारच्या काळात १०८ क्रमांकावर डायल करताच रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची सोय केली. मात्र, आदिवासी आणि अतिदुर्गम भागात रुग्णाला वेळेवर सेवा पुरविण्याऐवजी या रुग्णवाहिकेचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली होती. या रुग्णवाहिकेचा अन्य कारणासाठी वापर होत असल्याने या रुग्णवाहिका वेळेवर पोचत नसल्याचे आता नागरिक बोलू लागले आहेत. या रुग्णवाहिकेचा वापर इतर कर्मचाऱ्यांना वाहन चालविणे शिकविण्यासाठी सुद्धा वापर होत असल्याच्या तक्रारी आहेत.
सदर एम एच १४- सीएल ०७५० ही रुग्णवाहिका १० जून रोजी बनावट रुग्णाच्या नावे कॉल नोंदवून वैद्यकीय अधिकारी काही कर्मचाऱ्यांना पिकनिकसाठी ढास या पर्यटन स्थळी घेऊन गेली होती. सदर रुग्णवाहिका ही त्याठिकाणी ४-५ तास होती. पिकनिकला जाणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी चिचगड परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबत नागरिकांनी बेरार टाईम्सशी संपर्क करून तक्रार केली होती. सदर वृत्त प्रकाशित होताच आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली होती.
सदर प्रकरणी त्या रुग्णवाहिकेचे प्रभारी असलेले डॉ. जितेश वालदे यांना निलंबित केल्याचे आरोग्य खात्यातील सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, नागपूरच्या एका बड्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा या निलंबित वैद्यकीय अधिकाऱ्यावर वरदहस्त असल्याची चर्चा आरोग्य वर्तुळात आहे.