नक्षल्यांचा गोळीबार-एक इसम गंभीर जखमी

0
11

गडचिरोली, ता.३: नक्षल्यांच्या अॅक्शन टीमने भरदिवसा गावातच एका इसमावर गोळीबार केल्याची घटना काल(ता.२) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील कसनसूर उपपोलिस ठाण्यांतर्गत रेंगाटोला येथे घडली. या घटनेत रमेश दोहे हेडो(३५) गंभीर जखमी झाला आहे.
काल दुपारी कसनसूर दलमच्या अॅक्शन टीमचे पाच ते सहा साध्या वेशभूषेतील नक्षलवादी रेंगाटोला गावात गेले. त्यांनी रमेश हेडो यास घराबाहेर बोलावून त्याच्यावर दोन गोळया झाडल्या. रमेशने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र एक गोळी उजव्या खांद्याला, तर दुसरी मागच्या भागाला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. गोळीबार केल्यानंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी नक्षल्यांनी रमेश हेडो यास पकडले होते. परंतु तो नक्षल्यांच्या तावडीतून पळून आला होता. तेव्हापासून नक्षल्यांचा टार्गेट असल्याने तो गडचिरोलीतच वास्तव्य करीत होता. सोमवारी(ता.१) तो रेंगाटोला येथे गेला होता. ही माहिती मिळताच नक्षल्यांनी त्याचे गाव गाठून त्याच्यावर गोळीबार केला. या घटनमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.