सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सायबर लॅब उपयुक्त ठरणार- पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ

0
9

पत्रपरिषदेत दिली माहिती
गोंदिया,दि.१४ : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे घडत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या बळावर ई-बँकींगच्या माध्यमातून अनेकांना फसविले जात आहे. दहशतवादी कारवाया व सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर लॅब उपयुक्त ठरणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ यांनी दिली.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात आज आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, पोलीस निरीक्षक जे.एल.रणवरे, सहायक पोलीस निरीक्षक श्री.राठोड, पोलीस उपनिरीक्षक श्री.राजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ४४ ठिकाणी सायबर लॅब १५ ऑगस्ट पासून कार्यान्वित होणार आहे. सायबर लॅबच्या स्थापनेमुळे गुन्हेगारांना पकडण्यास व सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यास मदत होणार आहे. सोशल मिडियातून होणाऱ्या गुन्हेगारीला सुध्दा वचक बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोंदिया शहरात बिट पोलिसींगच्या माध्यमातून पोलीस विभागाची लोकाभिमुख कार्यपध्दती आणण्याचा विचार असल्याचे सांगून डॉ.भुजबळ पुढे म्हणाले, गोंदिया व आजुबाजूच्या गावांसाठी १० बिट निश्चित केले असून त्यासाठी बिट पथकही स्थापन करण्यात आले आहे. पोलीस स्टेशनचा ताण कमी करण्यासाठी पोलीस स्टेशनचे बिटच्या माध्यमातून विकेंद्रीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला वेळीच मदत करता येणे शक्य होणार आहे. महिला अत्याचार प्रतिबंध व बाल गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी निर्भया पथक स्थापण्यात आले आहे.
गोंदिया शहर व जिल्ह्याचा वाहतूक नियंत्रण आराखडा सुध्दा निश्चित करण्यात आला असल्याचे सांगून डॉ.भुजबळ म्हणाले, जड वाहतुकीला शहरातून प्रवेशाची वेळ निश्चित करण्यात येईल. नो पार्कींग झोन सोबतच पार्कींग झोनची व्यवस्था सुध्दा करण्यात येईल. वाहतुकीला अडचण होणार नाही याची काळजी घेण्यात येईल असेही डॉ.भुजबळ यांनी सांगितले.
जिल्ह्यात रस्ता सुरक्षा पथक नसल्यामुळे अनेक अडचणी येत असल्याचे सांगून डॉ.भुजबळ पुढे म्हणाले, नव्या पिढीला रस्ता सुरक्षेचे महत्व पटवून देण्यासाठी हे पथक उपयुक्त ठरणार आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून प्रत्येक तालुक्यात ५ शाळांची व गोंदियात १० शाळांची निवड रस्ता सुरक्षा पथकासाठी करण्यात येईल. त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात येईल. हे प्रशिक्षण मुलगामी परिवर्तनाचे माध्यम राहणार आहे. शाळेतील एक आठवड्याच्या तासिकेमध्ये एक तास रस्ता सुरक्षासाठी निश्चित केला जाणार आहे. भूमाफिया व रेतीमाफियांवर आळा घालण्यासाठी नियोजनातून काम करण्यात येत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.