नागपूरचा सर्वांगिण विकास करतानाच रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार – बावनकुळे

0
10

नागपूर,दि.१६ : शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने नागपूर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साध्य करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाबरोबरच कौशल्य विकासाची जोड देऊन विकासाचा पल्ला गाठायचा आहे. विकास प्रक्रियेत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचा 69 वा वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना ते बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, विभागीय आयुक्त अनुप कुमार, पोलीस आयुक्त एस.पी.यादव, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आमदार जोगेंद्र कवाडे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त श्रावण हार्डिकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी भगत, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, नागपूर शहरातील 2001 नंतरचे भूखंड नियमित होणार असून एक हजार चौरस फूट पर्यत क्षेत्राचे व 2001 पूर्वी खरेदी झालेले प्लॉटचे गुंठेवारी कायद्यातंर्गत नासुप्रद्वारे नियमितीकरण करण्यात येणार आहे. नागपूर शहाराच्या हद्दीबाहेर 25 किलो मीटरच्या परिसरात नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या नवीन नागपूरच्या प्रस्तावित आराखड्यास शासनाने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात 10 किलो मीटरपर्यंतचा विकास करण्यात येणार आहे.

जलशिवार योजनेतंर्गत जिल्ह्यात 313 गावांची निवड करण्यात आली. या गावामध्ये मार्च 2016 पर्यंत 3806.66 लाख रूपये खर्च करण्यात आले यातून 2634 कामे पूर्ण झाली आहेत. सन 2016-17 मध्ये नव्याने 185 गावांची निवड करण्यात आली आहे. यासाठी 13578.60 लाखाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

स्मार्ट शहराच्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट विलेजची संकल्पनेतील मौदा तालुक्यातील खंडाळा, कामठीतील खसाळा आणि तिरोडी हिंगणातील दाभा आणि नागपूर ग्रामीण मधील विहीरगाव या गावातील ग्रामपंचायतीचे सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. जिल्ह्यातील 500 ग्रामपंचायती डिजिटल ग्राम झाले आहेत. नागपूर जिल्ह्याला देशातील पहिला डिजिटल जिल्हा होण्याचा मान मिळणार आहे.

मेट्रो रेल्वे प्रकल्प मार्च 2018 पर्यंत कार्यान्वित होणार आहे. मेट्रोच्या उत्तर-दक्षिण मार्गावरील खापरी ते सिताबर्डी या टप्प्याचे काम वर्धा मार्गावर गतीने सुरू आहे. नागपूर शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून दक्षिण सांस्कृतिक केंद्राच्यावतीने कोराडी येथे 50 एकर जागेत शिल्पग्राम उभारले जाणार आहे. या शिल्पग्राम अभियानात राज्याची संस्कृती, लोककला, लहान मुलांसाठी कार्यशाळा व इतर सुविधा असतील.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (सन 2014-15) शिष्यवृत्तीधारक अखिलेश विनय गणेशकर, कु. साक्षी अनिल पिंपळे, सिद्धार्थ शरद चांडक, कु.मैत्रेयी मिलींद यावलकर, श्रृतेश तापेश पाटील, समीर विवेक पांडे, अभिषेक संदीप तानपूरे, क्षितू बिपीन देवगडे, कु.निकिता नवीन चांडक, हर्षीत संजय कोठारी यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

पोलीस अधीक्षक कार्यालय सिव्हिल लाईन व पोलीस मुख्यालय कामठी रोड या दोन्ही जमिनीबाबत उपस्थित झालेला प्रश्न निकाली लावून विभागास सहकार्य केल्याबद्दल महेशकुमार एच. गोयल, सल्लागार यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना संजय सिताराम सहारे – लिंगा, कळमेश्वर, संदीप शामराव किंदर्ले – पाचगांव, उमरेड, रवींद्र रंगराव नेवारे – खापरी, उमरेड, सतिश मारोतराव टेकाडे – गुमथडा, कामठी, मंगेश घनश्याम डाखरे – वडोदा, कामठी यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.