सायबर लॅबमुळे गुन्ह्यांच्या तपासाला गती येणार -मुनगंटीवार

0
10

चंद्रपूर,दि.१६ : पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक सायबर लॅबचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या लॅबमुळे सायबर प्रकारातील गुन्ह्यांचा तपास जलद गतीने होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक संदीप दिवान, जिल्हा परिषद सभापती देवराव भोंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री.राजपुत उपस्थित होते. सुरूवातीस मान्यवरांनी पोलीस प्रशासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधायुक्त सायबर लॅबच्या नामफलकाचे फित कापून उद्घाटन केले तसेच कक्षाची पाहणी करून तेथील सुविधांची माहिती जाणून घेतली.

पालकमंत्री श्री.मुनगंटीवार यांनी गेल्या 26 जानेवारी 2015 रोजीच जिल्ह्यात सायबर लॅब सुरू केली होती. लॅबचा हा उपक्रम आता संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आला आहे. यामुळे सायबर गुन्ह्यांना आळा बसणार असल्याचे सांगितले. लॅबसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधांचा जलद गुन्हे तपासासाठी फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. पोलीस प्रशासनात राज्यात जे-जे नवीन घडते त्याची सुरूवात चंद्रपूर येथून झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

पोलीस देशभक्त वर्ग आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्त्वाचे काम पोलीस विभाग करीत असतो. त्यामुळे पोलिसांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर येथे पोलीस कॉलनीसाठी 97 कोटी रूपये मंजूर केले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात अत्याधुनिक व्यायामशाळा उभी राहिली पाहिजे, त्यासाठी दीड कोटी रूपये मंजूर करणार असल्याचे ते म्हणाले. तालुकास्तरावर पोलीस स्टेशनच्या बांधकामासाठी निधीची मर्यादा असताना बल्लारशहा येथे 10 कोटी रूपये खर्च करून माडेल पोलीस स्टेशन उभे राहत असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सिमा व अंतर्गत सुरक्षेसाठी पोलिसांना केंद्रीय गृहविभाग मदत करणार असल्याचे सांगितले. सुरक्षेसाठी केंद्र शासनाकडून मदतीची कमतरता पडणार नसल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन पोलीस अधिकारी विकास मुंढे यांनी केले. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.