बदलत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर लॅब उपयुक्त ठरणार – बडोले

0
7

गोंदिया,दि.१६ : गुन्हेगार आता नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हेगारी करीत आहे. समाज माध्यमातून गुन्हेगारी वाढायला लागली आहे. समाज माध्यमात टाकण्यात येणाऱ्या पोस्टमुळे धार्मिक, जातीय तणाव निर्माण होत आहे. बँकींग एटीएमद्वारे ग्राहकांची लुबाडणूक होत आहे. त्यामुळे आता या बदलत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सायबर लॅब उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
१५ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील पहिल्या माळ्यावरील अत्याधुनिक सायबर लॅबच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री बडोले बोलत होते. याप्रसंगी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, जि.प.आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पुढे म्हणाले, सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील ४४ ठिकाणी सायबर लॅबचे उदघाटन होत आहे. निश्चितच अशाप्रकारच्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ही लॅब जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. ते म्हणाले, ही लॅब तांत्रिक बाबीची तपासणी करण्यासाठी परिपूर्ण आहे. अत्याधुनिक अशा या सायबर लॅबकरीता सी-डॅक यांचेकडून आधुनिक सॉफ्टवेअर पुरविण्यात आले आहे. या लॅबमध्ये मोबाईल चेक, नेसा, सायबर चेक, एडविक व विनलिफ्ट असून यामध्ये मोबाईल फोन इमेजींग, हार्ड डिस्क इमेजींग तसेच सोशन मिडियावर निरिक्षक करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोक जागृती अभियानाच्या माध्यमातून महिलांच्या मदतीसाठी प्रतिसाद ॲप्स, वाहन चोरी डॉट कॉम, पोलीस मित्र, निर्भया पथक, बिट मार्शल याबाबतची माहिती डॉ.भुजबळ यांनी यावेळी दिली.पालकमंत्री बडोले यांनी गृह विभागाने काळाची पाऊले ओळखून राज्यात एकाचवेळी सुरु केलेल्या सायबर लॅबच्या उदघाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखविला. तसेच यावेळी त्यांच्या हस्ते नागरिकांसाठी असलेल्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. उपस्थितांना समाज माध्यमातून जनजागृती करण्यासाठी पोलीस विभाग गोंदियाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या १७ व्हिडिओ क्लीप दाखविण्यात आल्या. या कार्यक्रमाला पोलीस विभागाच्या अधिकारी, कर्मचारी तसेच इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार व नागरिकांची उपस्थिती होती.