अधिकारवाणी नाकारली तरच मानवी विकास शक्य-पद्मभूषण प्रा.डॉ.माधव गाडगीळ

0
10

गडचिरोली, दि.२०: विज्ञानाने अधिकारवाणी मान्य करणं थांबवलं, तेव्हाच आधुनिक विज्ञान युरोपात विकसित झाला. आता भारतातील लोकांनीही विज्ञानवादी बनून अधिकारवाणी नाकारली, तरच या देशातील मानवी विकास शक्य आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मभू्षण डॉ.माधव गाडगीळ यांनी आज येथे केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ‘सामूहिक वनहक्क मान्यता प्राप्त करण्यासाठी ग्रामसभांसाठी वनकार्यआयोजना मार्गदर्शक तत्त्वे आणि मार्गदर्शिका’ या पुस्तिकेचे प्रकाशन डॉ.गाडगीळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त तथा विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष श्री.अनुपकुमार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्यपालांच्या कार्यालयातील उपसचिव परिमल सिंह, आदिवासी विकास विभागाच्या उपायुक्त डॉ.माधवी खोडे, विदर्भ विकास मंडळाच्या सदस्य सचिव निरुपमा डांगे, जिल्हाधिकारी रंगा नायक, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यपालन अधिकारी श्री.गोयल, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, मोहन हिराबाई हिरालाल, डॉ. विजय एदलाबादकर आदी मान्यवर उपस्थित होते.