चौकशी समिती गठीत :शिंगाडा तलाव सौंदर्यीकरणात गैरव्यवहार?

0
12

गोंदिया,दि.22 : तिरोड्यातील सिंगाडा तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या ८ कोटी रुपयांच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत प्राप्त तक्रारीच्या आधारे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी दोन सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते हे या समितीचे अध्यक्ष तर जिल्हा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे सदस्य आहेत. या द्विसदस्यीय समितीला महिनाभरात आपला अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर करायचा आहे.विशेष म्हणजे याच प्रकरणाला घेऊन नगरसेवक देवेंद्र तिवारी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.परंतु न्यायालयाने ती याचिका फेटाळत लघुपाटबंधारे विभागाला तलावासंबधी माहिती देण्याचे निर्देश दिले होते.
तिरोडा नगर परिषदेच्या वतीने तेथील सिंगाडा तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम केले जात आहे. ८ कोटी रुपयांच्या या कामात निविदा प्रक्रियेत व सौंदर्यीकरणाच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार तिरोडा येथील सुनील कुंभारे व इतर तिघांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यात नगर परिषदेचे अध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यावर कायदेशिर कारवाईची मागणी करण्यात आली. त्यानुसार उपायुक्त (महसूल) तथा प्रभारी अधिकारी, नगर परिषद प्रशासन नागपूर यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांना सदर कामाची चौकशी करण्यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी गोंदिया यांना दिले.
जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी याप्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी दोन सदस्यीय समिती नेमून त्यांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल एक महिन्यात सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय बाहेर येते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.