दिघोरी-साखरा येथील शेतकर्‍याचा बुडून मृत्यू

0
17

लाखांदूर,दि. २५ -खड्डयातील पाणी धानपिकाला देण्याच्या प्रयत्नात एका तरूण शेतकर्‍याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास साखरा शिवारातील पावरी कायनाईट खाण परिसरात घडली. किशोर खुशाल गोटेफोडे (३६) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.
लाखांदूर तालुक्यात साखरा येथे पावरी कायनाईट खाण आहे. या खाणीलगत तुळशीदास चिमनकार यांचे शेत आहे. धानपिकाला पाणी देण्यासाठी किशोर व तुळशीदास मोटारपंप लावण्यासाठी गेले होते. तुळशीदास पाईप लावण्यात मग्न होता. किशोरच्या हातातून पाईप पाण्यात पडल्याने ते काढण्यासाठी किशोर पाण्यात उतरला. दरम्यान तो खोल खडड्यात पडला. परंतु तो तुळशीदासला दिसला नाही. बराच वेळ होऊनही किशोर दिसत नसल्यामुळे तुळशीदासने शोधाशोध केली त्यानंतर गावाकडे जावून सदर प्रकार सांगितला. गावकरी जमा झाले. पोलिसांना माहिती देण्यात आली. स्थानिक लोकांच्या मदतीने पाण्यात शोधकार्य सुरू असतानाच किशोरचा मृतदेह खोल खडड्यात गवसला.किशोर गोटेफोडे हा अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे केवळ 0.२५ आर शेती असून कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती व मजुरीवर होता. त्यांच्यामागे वृद्ध आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.