नक्षल्यांच्या हिंसक कारवाया रोखण्यात सीआरपीएफला यश: पोलिस महानिरीक्षक राजकुमार

0
6

गडचिरोली, दि.२७: नक्षल्यांच्या विरोधात लढण्यासाठी जिल्ह्यात सीआरपीएफच्या ५ बटालियन तैनात असून, नक्षली कारवाया रोखण्यात सीआरपीएफला यश आल्याचा दावा केंद्रीय राखीव दलाच्या पश्चिम विभागाचे पोलिस महानिरीक्षक राजकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.सीआरपीएफच्या १९२ बटालियनच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राजकुमार यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यात सिव्हीक अॅक्शन उपक्रमाद्वारे दुर्गम भागातील जनतेशी सातत्याने संपर्क व संवाद साधण्याचे काम सीआरपीएफद्वारे होत आहे. परिणामी गोरगरीब नागरिक मुख्य प्रवाहात येऊ लागला आहे. येथील सीआरपीएफचे जवान स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने नक्षलवादाच्या उच्चाटनासाठी कार्यरत असून, अन्य राज्यांच्या तुलनेत गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया रोखण्यात आम्हाला यश आले, असेही ते म्हणाले.
राज्य पोलिसांद्वारे आत्मसमर्पण योजनेद्वारे नक्षल्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरु आहे. नक्षल्यांनी या योजनेचा लाभ घेऊन विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हावे, असे आवाहन राजकुमार यांनी केले. सीआरपीएफ सिव्हीक अॅक्शन उपक्रमाद्वारे ग्रामीण भागात शौचालय निर्मिती, सोलर लाईट व अन्य जीवनोपयोगी साहित्य वाटप करीत आहे. यामुळे गरीब नागरिकांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावत आहे, असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला सीआरपीएफच्या १९२ बटालियनचे पोलिस महानिरीक्षक दिनेश उनिवाल व कमांडंट मनोजकुमार उपस्थित होते.