30 आॅगस्टपासून महा अवयवदान अभियान

0
22

गोंदिया, दि.२९ :- नाविन्यपुर्ण तंत्रज्ञानाच्या आधारे मानवी प्रत्यारोपणाव्दारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहे. अवयवदानाअंतर्गत लाईव्ह ऑरगन डोनेशनव्दारे किडनी व लिव्हर प्रत्यारोपण करण्यात येते. मस्तिष्क स्तंभमृत पश्चात किडनी, लिव्हर, लग्ज, हार्ट व त्वचा इत्यादी अवयव दान करण्यात येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अवयव दानाचे महत्व जाणून रुग्णसेवेसाठी मोठया प्रमाणात अवयवदान जागृती करण्यासाठी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.अजय केवलिया यांनी पत्रकार परिषदेत आज सोमवारला दिली.पत्रपरिषदेला जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.देवेंद्र पातुरकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्यासह वैद्याकिय महाविद्यालयाचे प्रा.डाॅ.कांबले,प्रा.डाॅ.रुखमोडे,डाॅ.जायस्वाल यांच्यासह वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.
सद्यस्थितीत राज्यात सुमारे १२ हजार पेक्षा जास्त रुग्ण अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. जनतेतून अवयवदानाला चालना मिळावी यासाठी ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०१६ या कालावधीत महा अवयवदान अभियान- २०१६ राबविण्यात येणार आहे.
या अभियानात महा अवयवदानाबाबत जागृती करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, उच्च व तंत्र शिक्षण, महसूल, गृह, माहिती व जनसंपर्क या विभागाच्या सहकार्याने व समन्वयाने विविध उपक्रम राविण्यात येणार आहे.
मानवाला डोळे, त्वचा, यकृत, दृदय मुत्रपिंड व प्लिहा यासारख्या अवयवांची भेट मिळाली आहे. निसर्गाने दिलेली ही अवयवरुपी भेट मृत्यूनंतरही इतर गरजू रुग्णांना दान करता येवू शकते. मृत्यूच्या उंबरठयावर उभ्या असलेल्या अनेक रुग्णांना अवयवदानामुळे दुसरे जीवन जगण्याची संधी मिळू शकते.
महा अवयवदान अभियानातून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होवून अवयवदान करावे व मृत्यूच्या उंबरठयावर असलेल्या असंख्य रुग्णांना जीवनदान दयावे असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया यांनी केले आहे. अवयवदानाचे महत्व जाणून रुग्णसेवेसाठी अवयवदान करुन अनेक रुग्णांना जीवन जगण्याची संधी मिळवून देणा-या महा अवयवदान अभियानानिमित्त ३० ऑगस्ट रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८.३० वाजता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येथे गोंदिया शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी तसेच शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे विद्यार्थी,अधिकारी,प्राध्यापक व कर्मचारी वर्ग एकत्र होतील. तेथून अवयवदानाची जनजागृती करीत रॅली नेहरु चौक, गोरेलाल चौक, शहर पोलिस स्टेशन, गांधी पुतळा, जयस्तंभ चौक, जिल्हा न्यायालय मार्गे बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालय येथे पोहोचेल. या रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थी अवयवदानाचे महत्व पटवून देणा-या घोषणा देतील.मुलांच्या हाती असलेले संदेश फलक अवयवदानाचे महत्व पटवून देतील.
३१ ऑगस्ट रोजी शासकीय महाविद्यालय येथे सकाळी ८.३०ते सायंकाळी ६ वाजेपर्यत महा अवयवदान या विषयावर रांगोळी स्पर्धा, अवयवदान-महान कार्य या विषयावर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत शासकीय महाविद्यालयाचे व्याख्यान कक्षात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२.३० वाजता अवयवदान- महान कार्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धा तसेच पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्घे सहभाग घेऊ इच्छिणा-या स्पर्धकानी आवश्यक साहित्य सोबत आणावे.
१ सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय येथे सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.०० या वेळेत रक्तदान शिबीर, अवयवदान अभियानाअंतर्गत मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा या विषयी कायदेतज्ञ व न्यायवैद्यकशास्त्र तज्ञ यांचे व्याख्यान, अवयवदान नोंदणी शिबीर,अभियानाअंतर्गत उत्कृष्ठ काम करणा-यांचा सत्कार व महा अवयवदान जनजागृती अभियानाचा समारोप करण्यात येणार आहे.