पुराच्या पाण्यातूनच ते घराकडे निघाले

0
15
गडचिरोली,,दि.१२: रविवारच्या रात्रीपासून पुराचे पाणी पुन्हा वाढल्याने आलापल्ली-भामरागड मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी सायंकाळी ५ वाजतानंतर ही वाहतूक थोड्या प्रमाणात सुरू झाली. मात्र पर्लकोटाच्या पुलावर पाणी असताना एक ते दोन फूट पाण्यातून शेकडो महिला व नागरिकांनी आपल्या घराची वाट धरली.भामरागडचा या पावसाळ्यात किमान आठ ते दहा वेळा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. ३० वाहने भामरागडात अडकून पडले असून यातील नागरिकही पुलावरून एकफूट पाणी असताना चालत चालत निघून गेले.
राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या व विविध समस्यांनी सतत त्रस्त असलेल्या भामरागडला यंदा पावसाने बेजार करून टाकले आहे. रविवारी दिवसभर भामरागडचा संपर्क पर्लकोटाच्या पुरामुळे तुटलेला होता. सायंकाळी ५ वाजता हा संपर्क दळणवळणाने सुरू झाला. तोच पुन्हा रात्री पर्लकोटाच्या पुलावर पाणी चढल्याने सोमवारी दिवसभर भामरागडकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. सोमवारी दुपारी ३.५४ वाजता पुलावर एक फूट पाणी असताना १५ तासापासून अडकून पडलेल्या शेकडो महिला व नागरिकांनी पुराच्या पाण्यातून वाट काढत आपले गाव व घर जवळ केले.