‘गोसेखुर्द’ चे २९ दरवाजे अर्धा मीटरने उघडले

0
15

भंडारा : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वैनगंगा नदी भरून वाहत असून गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढला आहे. धरणाचा जलस्तर २४१.५00 मीटरवर स्थिर ठेवण्यासाठी धरण विभागाने ३३ पैकी २९ दरवाजे अर्धा मीटरने सुरू केले आहे. या दरवाजामधून १ लाख ४,५३२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूर येण्याची शक्यता बळावली आहे. वैनगंगा नदीच्या वरच्या भागात शनिवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात नदी-नाले आणि धरणाचा जलस्तर वाढला आहे. संभावित पूरस्थिती नियंत्रित करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला, कालीसराड आणि सिरपूर जलाशयाचे दरवाजे सुरू केल्यामुळे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आले आहे.
कालीसराड धरणाचे दोन दरवाजे १.६0 मीटर, पुजारीटोला धरणाचे १0 दरवाजे १.२0मीटर तर सिरपूर धरणाचे ६ दरवाजे 0.३0 मीटरने सुरू केले आहे. त्यामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर वाढत असून गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढत आहे.
गोसेखुर्द धरणाचा वाढता जलस्तर लक्षात घेता ३३ दरवाजांपैकी २९ दरवाजे सोमवारच्या रात्री ११ वाजता अर्धा मीटरने सुरू करण्यात आले. या दरवाजांमधून १ लाख ४.५३२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मंगळवारला सकाळी कारधा नदी पुलावर वैनगंगा नदीचा जलस्तर ४.९७ मीटर नोंदविण्यात आला असून ९ मीटर या धोक्याच्या पातळीपासून ४ मीटरने खाली आहे.