आर्थिक नियोजनशून्यतेने शेतकरी आत्महत्यांत वाढ – पी. साईनाथ

0
19
नागपूर berartimes.com दि. १९ – – शेती, शेतकरी आणि शेतकरी आत्महत्या हे या देशातील सर्वाधिक दुर्लक्षित विषय आहे. या विषयावर काेणीच काही बोलण्यास तयार नसतो. दुसरीकडे शेतकरी आत्महत्यांची आकडेवारीही कमी दाखवण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न असतात, असा अाराेप करतानाच आर्थिक नियोजनशून्यतेमुळेच शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचे परखड मतही ख्यातनाम कृषी अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी रविवारी व्यक्त केले.
डाॅ. आंबेडकर अॅग्रीकोज असोसिएशन आॅफ इंडिया या संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात, चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘राजकारणात दिसून येणारी लोकशाही सामाजिक व आर्थिक क्षेत्रात दिसून येत नाही हा किती विपर्यास आहे. सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील वाढती असमानता राजकीय क्षेत्रात स्फोट घडविल्याशिवाय राहाणार नाही, असे डाॅ. आंबेडकर यांनी संविधान समितीसमोर म्हटले होते. त्यांचे हे विधान आजही तितकेच प्रासंगिक आहे’, असे पी. साईनाथ म्हणाले.
नॅशनल क्राईम रेकाॅर्ड ब्युरो शेतकरी आत्महत्या तसेच अपघात बळींचा अहवाल दरवर्षी सादर करते. ३० जूनला हा अहवाल यायला हवा. आज सप्टेंबरचा पंधरवडा उलटूनही अहवाल आलेला नाही. शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी कमी दाखवा असे केंद्र सरकारचे निर्देश आहे. याच कारणांमुळे शेतकरी, शेतमजूर, इतर अशी विभागवारी करण्यात आली. यात ‘इतर’चा रकाना दिवसेंदिवस वाढत चालला आहे, याकडे साईनाथ यांनी लक्ष वेधले.