इरई धरणाचे सात दरवाजे उघडले, चंद्रपुरात समाधानकारक पाऊस

0
15

berartimes.com चंद्रपूर,दि.26- गेल्या दोन दिवसभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने इरई धरणाचे सात दरवाजे ०.५०, ०. २५ मिमीने उघडण्यात आले. रविवारी पावसाचा जोर होता. त्यामुळे नदी-नाल्या काठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला होता. दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद चंद्रपूर आणि भद्रावती येथे झाली. भद्रावती येथे १५५ मिमी, तर चंद्रपुरात ११९.८ मिमी पावसाची नोंद झाली. परतीच्या पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तर हलक्याप्रतीचा धानाचे नुकसान होणार आहे.
परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने शनिवारी जिल्ह्यात मुसळधार हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारपासून पावसाला सुरवात झाली. सायंकाळी पाच वाजता पावसाने जोर पकडला. रात्री उशिरापर्यंत चंद्रपूर शहरात मुसळधार पाऊस सुरूच होता. सायंकाळी दोन तासांतच ९० मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी पहाटेपर्यंत ११९.८ मिमी पावसाची नोंद झाली. यंदा समाधानकारक पावसाने जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली आहे. इरई धरणात ९० दलघमी इतका पाणीसाठा आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने धरणातील पाण्याची पातळी वाढत चालली आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसाने इरई धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत सहाही दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नदी-नाल्या काठावर राहणाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाने चंद्रपूर शहरातील सखल वस्त्यांत पाणी साचले होते. त्यात प्रामुख्याने इंदिरानगर, सरकारनगर, रहेमतनगर, सिस्टर कॉलनी याचा समावेश होता. पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे. भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी, नागभीड, मूल, सिंदेवाही, सावली, गोंडqपपरी, पोंभूर्णा, राजुरा, कोरपना, जिवती या तालुक्यांतही कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धानाचे उत्पादन घेतले जाते. त्यापाठोपाठ कापूस, सोयाबीनचा समावेश आहे. परतीच्या पावसाने या पिकांना संजीवनी मिळाली आहे.