गोवारी युवकांनी तांत्रिक कौशल्य प्राप्त करुन स्वत:ला सक्षम बनवावे -नितीन गडकरी

0
13

शासनाच्या प्राधान्यक्रमात विशेषत: वंचित आणि उपेक्षित वर्गाच्या विकासाकडे विशेष लक्ष
नागपूर, दि. 24 : गोवारी तरुणांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन तसेच तांत्रिक कौशल्य संपादन करून स्वत:ला रोजगारक्षम बनवावे, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी  केले.
ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे  आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समितीच्या वतीने आदिवासी गोवारी जमात संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी  महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, मिलिंद माने, प्रा. अनिल सोले तसेच जयप्रकाश गुप्ता, निवृत्त पोलिस महानिरीक्षक बी. एन.राऊत, आदिवासी गोवारी जमात संघटन समन्वय समितीचे समन्वयक शालीक नेवारे,जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती श्रीमती पुष्पाताई वाघाडे तसेच संपूर्ण राज्यातून आलेले गोवारी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोवारी बांधवांना मार्गदर्शन करतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की, गोवारी समाज हा प्रामुख्याने विदर्भातील समाज असून जवळपास  7 लाख लोकसंख्या असणाऱ्या हा समाज शेतमजुरी आणि अंगमेहनतीचे कामे करुन उपजिवीका करणारा आहे. गोवारी समाजाचा अनुसूचित समाजात  समावेश  व्हावा यासाठी  23 नोव्हेंबर 1994 रोजी काढण्यात आलेल्या नागपूर येथील  विराट मोर्चामध्ये  114 कार्यकर्ते मृत्युमुखी पडले. गोवारी बांधवाचे हे बलिदान समाज कधीही विसरु शकणार नाही.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील
गोवारी समाजाच्या विकासासाठी शासन सदैव सकारात्मक राहील, अशी ग्वाही दिल्याचेही श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले.  गोवारी समाजाचे सर्व प्रश्न आरक्षणाने सुटणार नाहीत. त्यासाठी समाजाची शैक्षणिक व आर्थिक प्रगती होणे आवश्यक आहे. यासाठी समाजातील प्रत्येक नागरिक किमान पदवीधर तरी असावा व त्याने कौशल्यावर आधारित ज्ञान मिळवून स्वत:ची प्रगती करावी.विदर्भाच्या विकास पर्वाला सुरुवात झाली आहे. या पर्वात औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. येत्या काही वर्षात ‘मिहान’ येथे तब्बल 50 हजार तरुणांच्या हाताला रोजगार प्राप्त होणार आहे. सध्या 9 हजार 870 युवकांना काम मिळाले आहे.  केवळ शासन आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून समाजाचा विकास होणार नाही. त्यासाठी युवकांनी स्वावलंबी बनावे आणि पुढाकार घेऊन समाजाचा विकास साधवा, असेही ते याप्रसंगी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक शालीक नेवारे यांनी केले. तर सूत्रसंचालन आणि आभार श्रीमती उज्ज्वला पाटील यांनी मानले.