दोनशे रुपयांसाठी कनिष्ठ लिपिक अडकली एसीबीच्या जाळ्यात

0
11

गडचिरोली,दि.८: आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचराच्या प्रवास भत्त्याच्या देयकाची रक्कम अदा करण्यासाठी त्याच्याकडून केवळ दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज याच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ लिपिक किरण प्रदीपराव इंगळे(३७) हिला रंगेहाथ पकडून अटक केली.एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्ता हा वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर पदावर कार्यरत आहे.

२०१५ मध्ये या परिचराचे २ हजार रुपयांचे प्रवास भत्त्याचे देयक कनिष्ठ लिपिक किरण इंगळे हिने मंजूर करुन दिले होते. हे देयक मंजूर करुन दिल्याचा मोबदला व २०१५-१६ चे वेतन प्रमाणपत्र देण्याकरिता कनिष्ठ लिपिक किरण इंगळे हिने तक्रारकर्त्या परिचरास दोनशे रुपयांची लाच मागितली. मात्र लाच देण्याची तक्रारकर्त्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज गडचिरोली येथील एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. यावेळी कनिष्ठ लिपिक किरण इंगळे हिला तक्रारकर्त्याकडून दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. एसीबीने तिच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७,१३(१)(ड)सह १३(२)अन्वये गुन्हा दाखल केला आहे. एसीबीचे पोलिस अधीक्षक राकेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एस.टेकाम, हवालदार विठोबा साखरे,शिपाई रवींद्र कत्रोजवार,मिलिंद गेडाम, गणेश वासेकर, सोनल आत्राम, घनश्याम वडेट्टीवार ही कारवाई केली.