‘लक्ष्मी’ घोटाळाप्रकरणी २० जणांविरूद्ध गुन्हे

0
22

भंडारा दि.10: सिल्ली येथील लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन कोट्यावधी रूपयांचा घोटाळा केला. लेखा परिक्षक देविदास अन्नपुर्णे यांच्या अहवालावरुन ७ कोटी ३४ लाख २७ हजार ४८५ रुपयांचा अपहार करण्यात आला असून यात सुवर्ण तारणातील ७ किलो ७८६ ग्रॅम ३४९ मिली ग्रॅम सोन्याचा समावेश आहे. याप्रकरणी कारधा पोलिसांनी संचालकांसह २० जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये संस्थेच्या अध्यक्षा मंजुषा देशमुख यांचे पती कृष्णकांत देशमुख यांच्यासह सासू तथा संचालिका लक्ष्मी विश्वनाथ देशमुख सासरे विश्वनाथ देशमुख यांच्यासह संस्थेच्या उपाध्यक्ष कुसूम वंजारी, संचालिका सविता बावनकर, वैशाली गिऱ्हेपुंजे, बारुबाई बडवाईक, मंगला हटवार, माधुरी आकरे, अनुशया वंजारी, सरिता चाचेरे, गिता गजभिये, वनिता देशमुख, कुसूम बावनकर, व्यवस्थापक नितीन वैद्य, सहायक व्यवस्थापक रिता ठवकर, कनिष्ठ लिपीक तथा अभिकर्ता मोहनलाल देशमुख, अभिकर्ता चंद्रकांत देशमुख, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा बचत अभिकर्ता भरत कुंभारे अशा २० जणांविरुध्द कारधा पोलिसांनी कलम ४०९, ४२०, ४६८, ४७१, ४७७(अ) ३४ महाराष्ट्र ठेवीदारांच्या आर्थिक आस्थापनामध्ये असणारा हितसंबंध जपणारा कायदा अंतर्गत विश्वासघात व फसवणूक केल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा विशेष लेखा परिक्षक श्रीकांत सुपे यांच्या मार्गदर्शनात लेखा परिक्षक देवीदास अन्नपुर्णे यांच्यासह कनिष्ठ लिपीक नीळकंठ मते, नितीन मेश्राम, लेखापरिक्षक बी.डी. सोनकुसरे, लिपीक एन.टी.मुन यांच्या पथकाने दोन महिन्यापासून लक्ष्मी पतसंस्थेच्या गैरकारभाराच्या तक्रारीवरुन कागदपत्रांची तपासणी व चौकशी केली. यात सुमारे ७ कोटी ३४ लाख २७ हजार ४८५ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याची बाब उघडकीस आली. याप्रकरणी अन्नपुर्णे यांच्या पथकाने जिल्हा विशेष लेखापरिक्षक यांना ८६५ पानांचा चौकशी अहवाल सादर केला. यात संस्थेच्या अध्यक्षा मनिषा देशमुख यांचे पती कृष्णकांत देशमुख हे मुख्य सुत्रधार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या गैरव्यवहार प्रकरणी एकाच कुटूंबातील सासू, सासरे, मुलगा व सुनेविरुध्द तक्रार करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास कारधाचे ठाणेदार आर. एच. इंगोले करीत आहे.