शिवसेनेचा सफाया : नगराध्यक्षपदी पूनम काटेखाये यांची वर्णी

0
8

पवनी,दि.20 : स्थानिक नगर पालिकेच्या निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्ष व नगर विकास आघाडीने प्रयत्नाची पराकाष्ठा केली. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा व सेना या घटक पक्षाच्या उमेदवारांवर मात करून विलास काटेखाये यांचे नेतृत्वात ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्थापन केलेल्या पवनी नगर विकास आघाडीला नगराध्यक्ष व ६ नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळाले आहे. त्याखालोखाल काँग्रेसने ५ नगरसेवक निवडून वर्चस्व सिद्ध केले आहे.

नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या पुनम विलास काटेखाये यांना ३८६८, पराभूत झालेल्या भाजपाच्या उमेदवार शिल्पा हरीश तलमले यांना ३०८२ तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बसपाच्या डॉ. विजया राजेश नंदुरकर यांना २७६१ मते मिळाली. नगर विकास आघाडीच्या पुनम विलास काटेखाये यांचा ७८६ मतानी विजय झाला. पराभूत झालेल्या काँग्रेसच्या शालिनी धमेंद्र नंदरधने यांना २१३२ तर राकाँच्या मिना हिरामन देशमुख यांना १४१६ मते मिळाली.पवनी नगर विकास आघाडीतर्फे आघाडीचे नेते भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष विलास काटेखाये यांचे नेतृत्वात गावात विजयी मिरवणूक काढण्यात आली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष पूनम विलास काटेखाये व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने विजयी मिरवणुकीत सहभागी झालेले होते. काँग्रेसतर्फे विजयी मिरवणूक काढण्यात आली.