नागपूर विद्यापीठात महानुभव अध्यासन केंद्र सुरू करण्याची कार्यवाही सुरू-मुख्यमंत्री

0
39

महानुभाव पंथाच्या तिर्थस्थळांना विकास करणार ,विदर्भातील तिर्थस्थळांना ‘क’ वर्ग दर्जा मिळणार

नागपूर दि. 26 :- समाज जेव्हा कर्मकांडाने ग्रस्त होता अशावेळी आत्मिक उन्नतीचा खरा मार्ग महानूभाव पंथाने दाखविला, चक्रधर स्वामीनी त्यावर कळस चढविला. या थोर विचारांचा अभ्यास अभ्यासकांना करता यावा यासाठी नागपूर विद्यापीठात महानुभाव अध्यासन केंद्र सुरु करण्याची कार्यवाही सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौदा येथे आयोजित महानूभव पंथीय मेळाव्यात दिली.
यावेळी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जि.प.अध्यक्षा निशा सावरकर, खासदार नानाभाऊ पटोले, आमदार डॉ. परिणय फुके, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष गोपीनाथ बाबा, नांदगावकरबाबा,विश्वनाथबाबा, महंत राहरेकर बाबा, बाभूळगावकर बाबा व महानुभाव पंथाचे महंत प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, लिळाचरित्र हा मराठीतील आद्य काव्य ग्रंथ आहे. या ग्रथांची निर्मीती विदर्भात झाल्याने मराठी ही सदैव महानुभाव पंथाची ऋणी राहील. विचार प्रवाहाच्या ग्रथांची निर्मीती रिध्दपूर येथे झाली आहे. या ग्रथांनी महानुभाव पंथाला समृध्द करण्याचे काम केले. हा विचार अभ्यासकांना अभ्यासता यावा यासाठी विद्यापीठात अध्यासन केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही शासनाने सुरू केल्याचे मुख्यमंत्र्यानी यावेळी सांगितले.
महानुभाव पंथ समाज निर्माण करण्याचे काम करत आहे. अनेक परिवारांना संस्काराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या पंथाने केले आहे. जीवन संस्कारमय करण्याचे मोठे काम करण्या-या या पंथाच्या सर्व तिर्थ स्थळांना शासन ‘क’ वर्ग तिर्थ स्थळांचा दर्जा देणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महानुभाव पंथाचे धर्मस्थळ विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. मौद्या येथील धार्मिक स्थळाला जाण्यासाठी 58 लाखाचा सिमेंट रस्ता मंजूर केला आहे. नागपूर जिल्हयातील सर्व धर्मस्थळांचा 5 कोटी रूपयाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आसल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
महानुभाव पंथाच्या वतीने या मेळाव्यात रिध्दपूरला मराठी विद्यापीठ स्थापन करावे, नागपूर विद्यापीठात चक्रधर प्रभू अध्यासन केंद्र सुरु करावे, नागपूर शहरात जागा व निधी द्यावा, मौदा तिर्थक्षेत्राला जाण्यासाठी सिमेंट रस्ता तयार करावा व नागपूर जिल्ह्यातील तिर्थक्षेत्रांचा विकास करावा अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले. या मेळाव्यात गोपीनाथ बाबा कापूस तळणीकर बाबा अनिल साहणी, बाळासाहेब मेहेत्रे यांचा मुख्यमंत्र्यांच्या‍ हस्ते सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात महानुभाव
पंथाचे अनुयायी मोठया संख्येने उपस्थित होते.