अखेर शनिवारच्या पहाटे नरभक्षक बिबट जेरबंद

0
11

लाखनी,दि.01 : चिखलाबोडी येथे चार वर्षीय खुशी चराटे या बालिकेचा बळी घेतल्यानंतर संपूर्ण गावात वनविभागाविरूद्ध संताप निर्माण झाला होता. संतप्त ग्रामस्थांनी चराटे कुटुंबीयांना आर्थिक मदत करा व बिबट्याला जेरबंद करा, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी रेंगेपार (कोठा) येथे पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात हा बिबट रेंगेपार शनिवारच्या पहाटे अडकला.यावेळी उपवनसंरक्षक उमेश वर्मा, सहायक उपवनसंरक्षक मनोहर गोखले, उपविभागीय पोलीस अधिकारी मोहनदास संखे, पोलीस निरीक्षक चकाटे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

चिखलाबोडी येथे आजीसोबत शेतात गेलेल्या खुशी चराटे या बालिकेला या बिबट्याने ठार केले होते. त्यानंतर वनकर्मचाऱ्याविरूद्ध ग्रामस्थांमध्ये संताप पसरला होता. शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यासाठी विरोध केल्यामुळे पोलिसांना बंदोबस्त लावावा लागला होता. त्यानंतर खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन ग्रामस्थांचे म्हणने ऐकून घेतले. नरभक्षक बिबट्यास जेरबंद करा, चराटे कुटुंबीयाला शासकीय मदत द्या, मृत मुलीच्या वडिलाला शासकीय नोकरीत सामावून घ्या आणि दोन वनरक्षकांना निलंबित करा, अशी मागणी केली. त्यानंतर शासनाकडून एक लाख रूपये रोख व सात लाख रूपयाचा धनादेश त्या कुटुंबीयांना देण्यात आला. त्यानंतर जमाव शांत झाला. त्यानंतर या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने जंगल परिसरात विविध ठिकाणी पिंजरे लावले होते. अखेर दहाव्या दिवशी रेंगेपार (कोठा) परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात हा बिबट पहाटेच्या सुमारास अडकला.