नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेसचा जनआक्रोश

0
5

चंद्रपूर दि.7: देशात लागू करण्यात आलेली नोटाबंदी आणि त्यामुळे निर्माण झालेली समस्या हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एककल्ली धोरणाचे फळ असल्याचा आरोप करीत शुक्रवारी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्र्त्यांनी जिल्ह्यात जनआक्रोश मांडला. हा आक्रोश प्रगट करण्यासाठी जनआक्रोश रॅली काढली, रस्त्यावर मोफत भाजीपाला वाटला आणि गांधी चौकात दिवसभर धरणा दिला. विशेष म्हणजे, मुद्दा एकच असला तरी हा जनआक्रोश काँग्रेसच्या नेत्यांनी तीन ठिकाणी मांडल्याने आवाज मात्र विखुरला.

माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौकात दिवसभर काँग्रेस कार्यकर्र्त्यांनी धरणा दिला. यात युवक काँग्रेस, काँग्रेस सेवादल पदाधिकारी, महिला काँग्रेसचे कार्यकर्ते, एनएसयुआय, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. दिवसभर धरणा दिल्यावर एका शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन पाठविले. सायंकाळी ५ वाजता धरणा समाप्त झाला.

दुसरे आयोजन जिल्हा काँग्रेस कमेटीने स्थानिक संजय गांधी मार्केेटपासून केले होते. कार्यक्रमस्थळी मंडप घालून छोटेखानी सभा घेण्यात आली. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे निरीक्षक राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जनआक्रोश रॅली काढण्यात आली. यात अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते हातात पंतप्रधान मोदी आणि केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करणारे फलक घेऊन सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यलयावर पोहचल्यावर एका शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. नोटाबंदीचा निर्णय जनतेसाठी आणि देशासाठी मारक असल्याने तो मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनातून केली.