स्वतंत्र विदर्भासाठी श्रीहरी अणे उतरणार मनपा निवडणूकीच्या प्रचारात

0
6

नागपूर, दि. 14 – आगामी महानगरपालिका निवडणूकांमध्ये राजकीय पटलावर आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ‘विरा’तर्फे (विदर्भ राज्य आघाडी) उडी घेण्यात येणार आहे. निवडणूकांत ‘विरा’तर्फे उमेदवार उतरविण्याची तयारी सुरू आहे. सद्यस्थितीत नागपूरसह अमरावती व अकोला मनपा निवडणुकांसाठी ‘विरा’ने प्रत्येकी एक-एक उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर उमेदवारांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी राजकीय पर्याय आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ते व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी ‘विरा’ या राजकीय पक्षाची घोषणा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यात येतील, असेही त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. उपराजधानीत मनपा निवडणूकांची लगबग सुरू झाली आहे. अशा स्थितीत ‘विरा’ची नेमकी भुमिका काय राहते, याकडे विदर्भवाद्यांचे लक्ष लागले होते.
खुद्द अ‍ॅड.अणे यांनीच यासंदर्भात ‘विरा’ची भुमिका स्पष्ट केली आहे. पक्षाची घोषणा करतानाच सर्व जागा लढविणार नसल्याचे आम्ही ठरविले होते. ज्या जागांवर शक्य आहेत. त्याच जागा लढणार. इतर विदर्भवादी राजकीय पक्षांसोबत आघाडी किंवा उमेदवार उभे करतांना तडजोड सुद्धा करता येईल. सद्यस्थितीत भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे व शिवसेना वगळता इतर १८ विविध पक्षांसोबत ‘विरा’तर्फे समन्वय साधण्यात येत आहे. सद्यस्थितीत आम्ही नागपूर मनपा निवडणूकीत एकच उमेदवार उभा करण्याचे निश्चित केले आहे, असे अणे यांनी सांगितले.