मुरपार लेडेझरी येथील सागवानाची अवैध कटाई

0
16

गोंदिया,दि.१९ :कोसमतोंडी परिसरातील मुरपार लेडेझरी येथील मार्तंड श्यामराव काशीवार यांच्या गटातील आदिवासी व गैरआदिवासींच्या शेतामधील सागवान अंदाजे २ लाख ४० हजार रुपयांचा माल कोसमतोंडी येथील क्षेत्रसाधक अधिकारी आणि वनरक्षक व वनमजुराच्या संगमताने कंत्राटदारासोबत कापण्यात आले.

हा माल संग्रहीत केल्याची तक्रार गावकऱ्यांनी १० जानेवारीला उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य संरक्षण कार्यालय नागपूर यांना देऊ केली असता जे.जे.खोबरागडे, उद्धव गायकवाड व भुते यांनी कापलेल्या मालाची तक्रार होताच, त्या मालाचा पंचनामा करून सर्व माल लॉगीन लिस्टप्रमाणे बरोबर आहे असा अहवाल तयार करून रेंज आॅफीस सडक-अर्जुनी येथील जनार्धन राठोड यांना दिला. त्या कापलेल्या झाडाची तक्रार जर गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नसती तर वनरक्षक व कंत्राटदार यांनी साठ-गाठ करून सर्वमाल हजम केला असता.

या सर्व मालाची चौकशी गोंदिया कार्यालयातील सहायक वनसंरक्षक यु.टी.बिसेन यांनी करून पासिंग हातोडा लावला. अधिकृत माल जप्त करून चार ट्रॅक्टर सागवान माल डोंगरगाव डेपोला जप्त करण्यात आला. या परिसरामध्ये कंत्राटदारासोबत साठ-गाठ करून येथील अधिकारी वर्गाचा कित्येक दिवसांपासून गोरखधंदा सुरू असल्याचे बोलले जात आहे.

गावकऱ्यांना हा प्रकार निदर्शनास आल्यावर अधिकारी उघड्यावर आले आहेत. शासन झाडे लावा, झाडे जगवा म्हणून दररोज संदेश देत असून वनरक्षकसुध्दा वनांचे रक्षण न करता वन तोडणाऱ्यांना साथ देत आहेत.या आदिवासी गटामध्ये सागवनाचे झाड लावले असताना झाडे तोडण्याचे प्रकरण तयार केले की नाही? अधिकाऱ्यांनी योग्य चौकशी केली काय? शेतकऱ्यांनी आपल्या गटातील माल कापल्यावर त्या गटाची चौकशी केली जाते या गटाची चौकशी झाली काय व जाणाऱ्या-येणाऱ्या रस्त्यावरील सागवनाचे झाड तोडता येते काय? याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.