भाजपाचे आमदार देवराव होळी यांची आमदारकी रद्द

0
9

नागपूर,दि.19- गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डाॅ. देवराव होळी यांच्यावर दाखल असलेल्या एका न्यायप्रविष्ट प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल देत डाॅ. होळी यांचे आमदार पद रद्द केले आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून भाजपतर्फे निवडून आलेले डॉ. देवराव होळी यांच्या निवडीला पराभूत उमेदवार नारायणराव जांभुळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकेद्वारे आव्हान दिले होते . डॉ. होळी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल असताना व विभागीय चौकशी सुरू असताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लेखी आक्षेप घेतल्यानंतरही त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारलाच कोणत्या आधारे असा प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आला होता .
नारायण जांभुळे यांनी अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकतर्फे ‘सिंह’ या चिन्हावर तर डॉ. होळी यांनी भाजपच्या ‘कमळ’ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. डॉ. देवराव होळी हे गडचिरोली जिल्हा परिषदेत वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेत होते. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक कायद्यान्वये त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. यानंतर त्यांनी शासकीय सेवेचे राजीनामा पत्र नागपूर विभागाच्या आरोग्य उपसंचालकांना पाठवले. आरोग्य उपसंचालकांनी विभागीय चौकशी सुरू असल्याने १४ ऑक्टोबर २०१३ रोजी त्यांचा राजीनामा नामंजूर केला. डॉ. देवराव होळी यांची निवड रद्द करून गडचिरोलीमध्ये पुन्हा नव्याने निवडणूक घ्यावी, हे प्रकरण सहा महिन्याच्या आत निकाली काढावे, या याचिकेचा संपूर्ण खर्च डॉ. होळी यांच्याकडून वसूल करावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती . या याचिकेवर न्यायालयाने निकाल देतांना आ. डॉ. देवराव होळी यांचे आमदार पद रद्द केले आहे.