आग प्रतिबंधासाठी योग्य समन्वय आवश्यक- अभिमन्यू काळे

0
22

आग सुरक्षा माहिती व प्रशिक्षण

गोंदिया,दि.१९ : आगीपासून जिवीत हानी टाळण्यासाठी आणि त्यावर प्रतिबंध करण्यासाठी योग्य समन्वय आवश्यक आहे. असे मत ‍जिल्हाधकिारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केले.
आज १९ जानेवारी रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व अदानी पॉवर लिमिटेड महाराष्ट्र तिरोडा यांच्या संयुक्त वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित आग सुरक्षा माहिती व प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी काळे म्हणाले, गोंदिया येथील हॉटेल बिंदल प्लाझाला २१ डिसेंबरला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत ७ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी प्रशासन व नागरिकांचे सहकार्य आवश्यक असून अदानी पॉवर लिमिटेडकडे असलेल्या आधुनिक आग प्रतिबंधक उपकरणासारखे उपकरणे गोंदिया अग्निशमन दलासाठी खरेदी करण्यात येईल. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत म्हणून नागरिकांनी एकमेकांच्या सहकार्यातून उपाययोजना करणे देखील गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. भूजबळ म्हणाले, अग्निशमन दल व बचाव पथकाकडे विशिष्ट गणवेश असला पाहिजे. विशिष्ट पेहरावामुळे इतरांची मदत घेणे देखील सोपे होते. आगीवर नियंत्रण करण्यासाठी त्यांच्याकडे आधुनिक उपकरणे व साहित्य असले पाहिजे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. प्रत्येक हॉटेल, लॉज, प्रतिष्ठान व संस्था यांनी देखील स्वत:चे फायर ऑडीट केले पाहिजे. असे ते यावेळी म्हणाले.यावेळी अदानी पॉवर लिमिटेड महाराष्ट्र तिरोडाचे अग्निशमन विभागाचे प्रमुख श्री त्रिलोकसिंग यांनी आपत्ती व त्याचे प्रकार आगीच्यावेळी करण्यात येणाऱ्या उपाययोजना व आत्मसुरक्षा, फायर सेफ्टीच्या दृष्टीकोनातून आग प्रतिबंधक मानके, महाराष्ट्र आग प्रतिबंधक कायदा, फायर संयंत्र व फायर ऑडीटची आवश्यकता याबाबतची माहिती त्यांनी सादरीकरणातून दिली.
जिल्हाधिकारी काया्रलयाच्या परिसरात प्रशिक्षणाला उपस्थितांना ऑईल फायरचे प्रात्यक्षिक गोंदिया नगरपरिषद अग्निशमन दलाच्या वतीने दाखविण्यात आले. ऑईलने लागलेल्या आगीवर होम फायरने कशाप्रकारे नियंत्रण मिळविता येते याचे अग्निशमन अधिकारी श्री कापसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली.प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्हयातील विविध हॉस्पीटल्स, हॉटेल्स, लॉज, व्यापारी संकुल, विविध प्रतिष्ठाने यांचे संचालक, शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, व्हाईट आर्मीचे युवक, विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी , राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवायोजनेचे विद्यार्थी, आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी, होमगार्डस, नगरपालिकांचे कर्मचारी तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे देण्यात आली.