आग प्रतिबंधांच्या रंगीत तालीमेतून दिला जागृतीचा संदेश

0
7

गोंदिया,दि.२० : गोंदिया येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या हॉटेल बिंदल प्लाझाला २१ डिसेंबर २०१६ ला पहाटे आग लागली. या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे आग प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा प्रश्न निर्माण झाला. आगीवर मात करण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करण्यासोबतच आग प्रतिबंधाच्या रंगीत तालीमेतून जनजागृतीचा संदेश नागरिकांना देण्यात आला. जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांना आगीच्या घटनेप्रसंगी जिवीत हानी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची माहिती रंगीत तालीमेतून देण्यात आली.
गोंदिया येथील बाजारपेठेत असलेल्या हॉटेल रेनबो येथे आग प्रतिबंधाबाबतची रंगीत तालीम घेण्यात आली. ही तालीम बघतांना अनेकांना असे वाटत होते की, प्रत्यक्षात आग लागलेली आहे आणि ती विझविण्यासाठी अग्निशमन दल व प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. या रंगीत तालीम प्रसंगी अग्निशमन बचाव व शोधपथक, अग्निशमन वाहन तसेच अदानी पॉवर लिमिटेड महाराष्ट्र तिरोडा येथील अग्निशमन दलाचे अधिकारी व त्यांचे सहकारी त्याचप्रमाणे गोंदिया नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी या तालीमेमध्ये व्यस्त होते.
हॉटेल रेनबोला आग लागलेली आहे आणि या हॉटेलमध्ये अडकलेल्या व्यक्तींना आगीतून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आग आटोक्यात लवकर आणण्यासाठी फोम फायरचा वापर, पाण्याचा वापर तसेच आगीत अडकलेल्या व्यक्तींना खिडकीतून सुरक्षित काढण्यासाठी सीडी(निशानी) लावण्यात आली. आगीतील धुरामुळे हॉटेलमध्ये बेशुध्द पडलेल्या व्यक्तीला स्ट्रेचरवरुन रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी आगीतून सुरक्षित बचावलेल्या व्यक्तींची गणना करण्यात आली . यामधून खात्री करण्यात आली की सर्व लोक सुरक्षित खाली आलेली आहेत.
आगीतून व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडरचा वापर, मास्क, हेल्मेट, विशिष्ट गणवेश धारण करुन प्रात्यक्षिके करण्यात आली. आपतकालीन स्थितीत पोलीसांकडून मदतीसाठी १००, अग्निशमनासाठी १०१ आणि रुग्णवाहिकेसाठी १०२ व १०८ या नंबरची माहिती विस्तृतपणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी यावेळी दिली. अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेडचे मुख्य सुरक्षा अधिकारी श्री त्रिलोकसिंग यांनी देखील करण्यात येत असलेल्या प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. आग प्रतिबंधाच्या रंगीत तालीमेसाठी हॉटेल रेनबोचे संचालक विकेश सोनछात्रा व संजय जैन यांनी हॉटेल उपलब्ध करुन दिले.

हॉटले रेनबो येथील रंगीत तालीम प्रसंगी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश परबते, तहसिलदार अरविंद हिंगे, अपर तहसिलदार के.डी.मेश्राम, गोंदिया पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश शुक्ला, श्री पाटील, श्री सांडभोर, गोंदिया शहरातील विविध हॉटेल, लॉज दुकाने यांचे संचालक व त्यांचा कर्मचारी वर्ग, गोंदिया नगरपरिषद अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी प्रकाश कापसे, पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.