लाचखोर महिला सरपंचाला एक वर्षाची शिक्षा

0
15

भंडारा दि.२२-: घरकूल मंजूर करण्यासाठी एक हजार रूपयांची लाच स्वीकारताना महिला सरपंचाला अटक केली होती. याप्रकरणी विद्यमान विशेष न्यायाधीश – १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी शनिवारला लाचखोर सरपंचाला एक वर्षाची शिक्षा ठोठावली.

सकोली तालुक्यातील गुढरी येथील महिला सरपंच शालीना राजप्रकाश खांडेकर (३५) रा. सराटी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिला सरपंचाचे नाव आहे. सदर प्रकरण २३ आॅक्टोबर २०१० चे आहे. साकोली पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत गुढरी येथील देवानंद सुदाम ईलमकर (४०) यांना घरकुलची आवश्यकता होती. त्यामुळे देवानंद यांनी सरपंच शालीना खांडेकर यांना घरकुल मंजूर करून देण्याची गळ घातली. यावर सरपंच यांनी देवानंदला १००० रूपयाची मागणी केली. मात्र लाच देण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे सदर महिला सरपंचाविरूध्द तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून एक हजार रूपयांची लाच स्विकारताना महिला सरपंच शालीना खांडेकर यांना रंगेहात अटक केली. याप्रकरणी त्यांच्याविरूध्द साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तत्कालीन पोलीस उपअधीक्षक वासुदेव सुर्यवंशी यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यात विद्यमान विशेष न्यायाधीश – १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी सर्व साक्षपुरावे तपासले. यात सरपंच शालीना खांडेकर या दोषी आढळून आल्या. याप्रकरणी न्यायाधीश पांडे यांनी आरोपी महिला सरपंच यांना कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत एक वर्षाची शिक्षा तसेच १००० रूपये दंड. दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा तसेच कलम १३ (१) (ड) सहकलम १३ अन्वये एक वर्षाची शिक्षा तसेच एक हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील टवले यांनी मांडली.