जिल्हा ग्रंथालयातून जात वैधता कार्यालय हलविण्याची मागणी

0
13

गोंदिया,दि.२५-जिल्हा ग्रंथालयात नव्याने सुरू झालेले जात वैधता कार्यालय इतरत्र हलविण्यात यावे, तसेच विद्यार्थ्यांना भीती दाखविणार्‍या समाज कल्याण उपायुक्तांच्या निषेधाचे निवेदन ग्रंथालयात अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि.२4) जिल्हाधिकार्‍यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, जिल्हा ग्रंथालयात शहरातील व परिसरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी दूरवरून येतात. २0१0 पासून आजवर याच ग्रंथालयात अभ्यास करून शंभरावर सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळालेली आहे. परंतु, काही महिन्यापूर्वी जिल्हा ग्रंथालयात जात वैधता कार्यालय सुरू झाले आहे. या कार्यालयात येणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ग्रंथालयात होणार्‍या गोंगाटामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. यासंदर्भात तक्रार केल्यावर जिल्हा ग्रंथालयच हटविण्याची भीती उपआयुक्त श्री धारगावे यांनी दाखविल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून त्याचा निषेधही व्यक्त केला आहे.
त्यामुळे जिल्हा ग्रंथालयातील जात वैधता कार्यालय इतरत्र हलविण्यात यावे, तसेच ग्रंथालयात ३00 विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी. निवेदन देतांना मिथून बागडे, प्रमोद वाकले, करण क्षीरसागर, विकास वालदे, सतीश मेर्शाम, राजेंद्र गायकवाड, प्रतिक वाढई, नंदकिशोर पटले आदी विद्यार्थी उपस्थित होते