शासनाची विश्वासार्हता टिकवून ठेवावी- अनंता मडावी

0
18

लेखा व कोषागार दिन साजरा
गोंदिया,दि.१ : विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि कामात सुटसुटीतपणा आणण्यासाठी राज्य शासनाने १९६५ मध्ये लेखा व कोषागार विभाग स्वतंत्र तयार केला. शेवटच्या घटकातील व्यक्तीला लाभ वेळीच मिळवून देण्यात लेखा व कोषागार विभागाची महत्वाची भूमिका आहे. शासनाची आपल्यावर असलेली विश्वासार्हता यापूढेही टिकून राहील असे काम करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अनंता मडावी यांनी केले.
आज जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने १ फेब्रुवारी हा दिवस लेखा व कोषागार दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून श्री.मडावी बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक निधी लेखा विभागाचे सहायक संचालक रमेश कुंभरे, जि.प.चे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय जवंजाळ, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखा अधिकारी एल.एच.बाविस्कर यांची उपस्थिती होती.
श्री.मडावी पुढे म्हणाले, शासनाच्या अनेक विभागाच्या कार्यालयात सहायक लेखाधिकारी ते संचालक पर्यंतची लेखा विभागाची पदे आहेत. तेथे सर्व अधिकारी हे काटेकोरपणे, पारदर्शकतेने आणि नियमाने सक्षमपणे काम करीत आहेत. या विभागाची ७० टक्के पदे ही प्रतिनियुक्तीने आणि ३० टक्के पदे मुळ विभागात कार्यरत आहेत. या विभागात अनेक स्थित्यंतरे आलीत, त्याचा या विभागाने स्विकार केला. नवीन संगणकीय प्रणालीत देखील या विभागाने सक्षमपणे काम केले. शासनाचे महत्वपूर्ण काम या विभागाकडून होत आहे. शासनाचा एक आर्थिक सल्लागार म्हणून हा विभाग काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.नेमाडे म्हणाले, जिल्ह्यात कोषागार विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असतांना देखील या विभागाचे अधिकारी-कर्मचारी चांगले काम करीत आहे. विविध विभागात लेखा व कोषागार विभागाचे अधिकारी असून ते नियमाने शासनाचा निधी वेळीच खर्च करण्याच्या दृष्टीने दक्ष असतात. विविध योजनांचा निधी सामान्य जनतेपर्यंत व लाभार्थ्यांना वेळीच मिळाला पाहिजे यासाठी अतिशय काळजीपूर्वक काम करीत असल्याचे सांगितले.
काम करतांना चुका होवू नये याची आपण काळजी घेत असल्याचे सांगून श्री.नेमाडे म्हणाले, वर्षातून एकदा तरी लेखा व कोषागार विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र यावे, त्यांचा समन्वय राहावा यासाठी हा कोषागार दिन असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सहायक संचालक श्री.कुंभरे व लेखा अधिकारी श्री.बावीस्कर यांनीही मार्गदर्शन केले. नुकत्याच संपन्न झालेल्या लेखा व कोषागार विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या स्थानिक निधी लेखा शाखेच्या सुनीता सूर्यवंशी यांनी १०० मीटर धावणे व ३ कि.मी.चालणे, एकेरी कॅरम स्पर्धेत व्ही.एन.बंसोड, बॅडमिंटनमध्ये पी.डी.मुंडले, बुध्दीबळमध्ये एस.एच.ठकरेले, क्रिकेटमध्ये एस.डी.भैरम, व्ही.बी.कटकवार, एस.डब्ल्यू.उके, ए.एस.तेलतुंबडे, थाळीफेकमध्ये राजेश चिभकाटे आणि गोळाफेकमध्ये संजय मांढळे यांचा मान्यवरांच्या हस्ते, पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आले.
वार्षिक कामकाज अहवालाचे वाचन अपर कोषागार अधिकारी ए.यु.हुमने यांनी केले. कार्यक्रमाला लेखाधिकारी श्री.कुंभलकर, श्री.मांढळे, श्री.रामेलवार व अन्य लेखाधिकारी तसेच लेखा व कोषागार विभागाचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक अपर कोषागार अधिकारी पी.डी.पारधी यांनी केले. संचालन आर.एस.पांडे यांनी तर उपस्थितांचे आभार सुरेश डोंगरे यांनी मानले.