रमाईच्या त्यागातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडले : हुमे

0
8

अर्जुनी मोरगाव दि.१२ -: महिला बळकट असेल तर महापुरुष निर्माण होतात आणि महिला चुकली तर संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होते. भौतिक सुखाने विचार बदलत नाही तर चांगल्या कृतीतून आपले विचार बदलविले पाहिजे. आदर्श व तत्त्वज्ञानी पिढी घडविण्यासाठी स्वत:मध्ये बदल घडवावे लागते. असेच आचरण व बदल माता रमाई, जिजाऊ व सावित्रीबाईंनी दिले. त्यामुळेच मोठमोठे महापुरुष घडले.
जाती व्यवस्थेने काम करणे म्हणजे गुलामगिरी करणे होय, महापुरुषांनी कोणत्याही जाती व्यवस्थेत काम केले नाही. म्हणून ते महापुरुष बनले. बुद्धाचे विचार अंगीकारण्यासाठी प्रथम शुद्ध व्हावे लागते. शिक्षित लोकांनी समाज ऋण फेडण्यासाठी सदैव पुढे यावे, समाज सुधरविण्याची जबाबदारी आता महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. आम्हाला रमाईच्या आदर्शातून बोध घेण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ता व विचारवंत सुनीता हुमे यांनी केले.
आनंद व मिलिंद बुद्धविहार समिती तसेच युवा संघ बोंडगावदेवीतर्फे रमाई आंबेडकर जयंतीदिनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तनुजा नेपाले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून तुमसरच्या श्रीमती डहाट, ममता रंगारी व बोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भाग्यवान फुल्लुके यांनी तर आभार उके यांनी मानले.