सत्यशोधकी साहित्यातच देणार नवे आत्मभान- भारत पाटणकर

0
7

वर्धा दि.१३: महात्मा ज्योतिराव फुले यांची प्रेरणा स्वीकारण्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणाऱ्या परिवर्तनवादी विचार स्वीकारुन पुढे गेले पाहिजे. कारण सत्यशोधकी साहित्यच नवे आत्मभान देऊ शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर यांनी केले. व्यंकटराव गोडे साहित्य नगरीत आयोजित दहाव्या सत्यशोधक साहित्य संमेलनातील परिवर्तनवादी साहित्य प्रवाहांचा मूलस्त्रोत या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संशोधक डॉ. श्रीराम गुंदेकर तर वक्ते म्हणून डॉ. काशिनाथ बऱ्हाटे, डॉ. शंकर बोऱ्हाडे उपस्थित होते.
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, प्रस्थापित मराठी साहित्य व सत्यशोधकी साहित्याचे मुलादर्श पूर्णत: वेगळे आहेत. भारतीय संविधानाला अभिप्रेत मूल्यांच्या आधारावर सत्यशोधक साहित्यातून शोषित व वंचितांचे प्रश्न मांडले जातात. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या संयुक्त विचारातूनच सत्यशोधक साहित्य समृद्ध होणार आहे. त्यामुळे या साहित्याला बंदिस्त करू नका, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. श्रीराम गुंदेकर म्हणाले, नव्या लेखकांनी केवळ ललित लेखन न करता वैचारिक व संशोधनपर लेखन केले पाहिजे. सत्यशोधकी साहित्याने केवळ कलावादी मूल्यांशी बांधील असून जीवनवादी आशय हाच मुख्य गाभा आहे. त्यामुळे सभोवतीचे जगणे समजावून विवेकाच्या आधारावर लेखन करण्यासाठी पुढे आले पाहिजे. कारण हे साहित्य सर्व परिवर्तनवादी प्रवाहांचा मुलस्त्रोत ठरला आहे. डॉ. काशिनाथ बऱ्हाटे यांनी परिवर्तनवादी साहित्याचे वैशिष्टय अधोरेखित केले. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी सत्यशोधक चळवळ व साहित्य यावर विवेचन केले. संचालन डॉ. सुधाकर सोनोने यांनी केले. आभार संजय गावंडे यांनी मानले. सायंकाळी सुषमा वासेकर यांनी ‘मी सावित्री बोलतेय’ हा एकपात्री नाटयप्रयोग सादर केला. आयोजनासाठी राजेंद्र कळसाईत, कपिल थुटे, गुणवंत डकरे, डॉ. प्रियराज महेशकर, प्रा. महाजन, प्राचार्य जनार्दन देवतळेंसह पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.