वाळूची अवैध वाहतूक करणारे ७८ ट्रक व ३ जेसीबी जप्त

0
15

सिरोंचा, दि.१३: रेती घाटातून रेतीची ओव्हरलोड व अवैधरित्या वाहतूक करणारे तब्बल ७८ ट्रक व ३ जेसीबीवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज मध्यरात्री कारवाई केली.
सिरोंचा येथील गोदावरी नदीघाटातून सीमांकित केलेल्या जागेपेक्षा अधिक जागेतून रेतीचे उत्खनन करुन वाहतूक केली जात आहे. शिवाय महाराष्ट्र शासनाने आपल्या सीमेत धरमकाटा न लावल्याने दररोज ४०० ते ५०० ट्रक ओव्हरलोड रेती भरुन तेलंगणा राज्यात नेत आहेत. दुसरीकडे तेलंगणा सरकारने आपल्या सीमेत धरमकाटा लावून अतिरिक्त रेती काढून महसूल वाढविण्याचा प्रकार सुरु केला आहे. ही बाब प्रसारमाध्यमांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर आज मध्यरात्री उपविभागीय अधिकारी व अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी वडधम व नगरम घाटावरुन तसेच अंकिसा-सिरोंचा मार्गावरुन रेतीची वाहतूक करणारे तब्बल ७८ ट्रक व ३ जेसीबी जप्त केल्या.
नगरम घाटावरुन ४१ ट्रक ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी ११ ट्रकमध्ये रेती भरलेली होती, तर ३० ट्रक रिकामे होते. तेथूनच ३ रेतीचा उपसा करणाऱ्या ३ जेसीबीही ताब्यात घेण्यात आल्या. तसेच वडदम घाटावरुन क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतूक करणारे ३१ ट्रक पकडण्यात आले. अंकिसा-सिरोंचा मार्गावरुन ६ ट्रक ताब्यात घेण्यात आले. त्यात वडदम घाटावरुन रेती भरुन नेणारे ४, अंकिसा व चिंतारवेला घाटावरुन रेती वाहतूक करणाऱ्या प्रत्येकी एका ट्रकचा समावेश होता.