करांडलीच्या वनजमिनीवरील अतिक्रमण भुईसपाट

0
16

अर्जुनी-मोरगाव दि. 17 : अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी.रहांगडाले यांच्याकडे सध्या गोठणगाव कार्यालयाचा पदभार आहे. वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम त्यांनी अरततोंडी गावापासून सुरु केली. करांडली बीटामध्ये अतिक्रमण करुन वन जमिनीवर बांधलेल्या झोपड्या आरएफओ रहांगडाले यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या पथकांनी भुईसपाट केल्या.

गोठणगाव रेंजमधील करांडली बीटमधील कपार्टमेंट नंबर १९९ मध्ये गावकऱ्यांनी अतिक्रमण करुन तात्पुरत्या स्वरुपाच्या झोपड्या तयार करुन वास्तव्य केले होते. दिवसेंदिवस वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण वाढत आहे. पर्यायाने जंगलाचे प्रमाण कमी होत आहे. जबरदस्तीने वनविभागाची जागा गिळंकृत करण्याच्या मानसिकतेला लगाम लागावा म्हणून आरएफओ रहांगडाले यांनी अतिक्रमण हटाव मोहिम यशस्विपणे राबवून जागा खुली करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.करांडली येथील जागा काबिज करुन झोपड्या बांधणाऱ्यांचे स्वप्न एकाएकी धुळीस मिळाले. वनविभागाच्यावतीने अतिक्रमण भुईसपाट झाल्याने अतिक्रमणधारकांमध्ये धास्ती भरली आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी आरएफओ रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.