आदर्श गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक-पालकमंत्री

0
18

कनेरी/राम येथे अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन

गोंदिया,दि.6 – गेल्या एका वर्षात कनेरी/राम येथे अनेक विकास कामे करण्यात आली आहे. गावात राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उघडण्यात येणार आहे. बचतगटाच्या माध्यमातून गावातील महिलांना सक्षम करण्यात येणार असून बेरोजगार युवक एकत्र आले तर त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून स्वावलंबी करण्यात येईल. कनेरीला आदर्श गाव म्हणून सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
काल (ता5) सडक/अर्जुनी तालुक्यातील आमदार आदर्श गाव योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या कनेरी/राम या गावी पालकमंत्र्यांच्या हस्ते 9 सिमेंट रस्त्याच्या कामाचे आणि जनसुविधा अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या स्मशानभूमी रस्ता, चावडी व बोअरवेलच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. यानिमित्ताने ग्रामपंचायत येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पं.स.सभापती कविता रंगारी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य माधुरी पातोडे, पं.स.सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, सरपंच इंदूताई मेंढे, उपसरपंच प्रेमलाल मेंढे, पोलीस पाटील उमेश तिवाडे, माजी सरपंच सीताराम पाउलझगडे, आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत धनगाये, नायब तहसिलदार अखील मेश्राम, तालुका भाजपा अध्यक्ष विजय बिसेन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत गहाणे, उपविभागीय अभियंता दिलीप देशमुख, सा.बा.विभागाचे उपअभियंता श्री.अगडे, परमानंद बडोले, चेतन वडगाये यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले यावेळी म्हणाले, गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल. सिंचनासाठी शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्यात येईल. कनेरीला डासमुक्त करण्यासाठी 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून शोषखड्डे तयार करण्यात येतील. सडक/अर्जुनी येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरु करण्यात येईल. सहकारी संस्थेला गोदाम बांधण्यासाठी मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला कनेरी/राम येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.