जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न करा-पालकमंत्री बडोले

0
6

गोंदिया,दि.6 : तालुक्यातील जनतेला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यंत्रणांनी काम करावे.तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी आणण्यासाठी जास्तीत जास्त कोरडवाहू शेती सिंचनाखाली आणण्याचे नियोजन विविध विभागाने योग्य समन्वयातून करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
रविवारी अर्जुनी/मोरगाव पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित पंचायत समितीच्या वार्षिक आमसभा व सरपंच संमेलनात अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, माजी आ.दयाराम कापगते, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे, जि.प.सदस्य कमल पाउलझगडे, मंदा कुमरे, गिरीष पालीवाल, पं.स.सदस्य प्रेमलाल गेडाम, होजराम कोरेटी, रामलाल मुंगनकर, पिंगळाबाई ब्राम्हणकर,करुणा नांदगावे, अर्चना राऊत, जयश्री पंधरे, जि.प.माजी सभापती उमाकांत ढेंगे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लायकराम भेंडारकर, नामदेवराव कापगते यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, कृषि विभागासह अन्य विभागांनी जलयुक्तची कामे हाती घ्यावी. अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या बालकांची आबाळ होणार नाही यासाठी अंगणवाडी सेविकांची रिक्त पदे येत्या 10 दिवसात भरावी. जे शिक्षक दारु पिवून शाळेत येतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. शिक्षकांनी मुख्यालयी राहावे. माजी मालगुजारी तलावांची दुरुस्ती करतांना खोलीकरण करावे. पाणीपुरवठा योजनेवरील पाणी मंडळाची वैधता तपासून घेतली पाहिजे. रोजगार हमी योजनेची कामे ग्रामपंचायतींनी कृषि विभागाशी योग्य समन्वय राखून करावी. असे सांगितले.ग्रामपंचायतने गावाच्या विकासाचा आराखडा रोजगार हमी योजनेतून तयार करावा असे सांगून पालकमंत्री बडोले
पुढे म्हणाले की, रोजगार हमी योजनेतून कामे करतांना 60 टक्के ग्रामपंचायत स्तरावर व 40 टक्के यंत्रणांनी कामे करावीत.ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येणारी कामे ही ग्रामसभेने सूचवावी. ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठीमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यशस्वीपणे राबवावे. हा तालुका कुपोषणमुक्त करण्यासाठी बालकल्याण व आरोग्य विभागाने पुढाकार घ्यावा. डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरावी. अर्जुनी/मोरगाव येथी नवीन प्रशासकीय इमारत व बहुउद्देशीय सभागृह लवकरच उभारण्यात येईल. तालुक्याला मत्स्य संवर्धन विषयक 24 योजनांचा लाभ मिळणार असल्याचे सांगून ते म्हणाले, तालुक्यात दुधाचे उत्पादन वाढल्यास शेतीपुरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार दयाराम कापगते,‍ जि.प.उपाध्यक्ष रचना
गहाणे, सभापती शिवणकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील बहुतांश गावचे सरपंच उपस्थित होते. त्यांनी आपल्या समस्या सभेतून पालकमंत्र्यापुढे मांडल्या.प्रास्ताविकातून गटविकास अधिकारी जमईवार यांनी सांगितले की, तालुक्यातील 70 पैकी 69 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. 21 कोटीचे कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात आली. 7509 लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ देण्यात येईल. 14 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींनी आरओ व कुलींग पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. प्रत्येक अंगणवाडीला ग्रामपंचायतने वॉटर फिल्टर दयावे असे सांगितले. सभेला तालुक्यातील आरोग्य, कृषी,शिक्षण, सिंचन व अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार श्री.भावे यांनी मानले.