शासकीय बालसुधार गृहातून 14 मुलांचे पलायन

0
20

नागपूर,दि. 29 : नागपूरच्या बालसुधार गृहातून तब्बल 14 मुले पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, पळ काढलेल्या 14 मुलांपैकी 3 मुले नागपूर रेल्वे स्टेशनवर सापडली आहेत.बाकीच्या 11 मुलांचा अद्यापही शोध सुरु आहे.पहाटे चार वाजेच्या सुमारास या मुलांनी आधी त्यांच्या सेक्शन मधील दाराचा लोखंडी कडी तोडली. त्यानंतर सुधार गृहाच्या गच्चीवरचं दार तोडून गच्चीला लागून असलेल्या झाडातुन ही मुले खाली उतरली आणि अंधाराचा फायदा घेत या मुलांनी सुधारगृहातून पळ काढला. शहरातल्या पाटणकर चौकातल्या शासकीय बाल सुधारगृहातली ही मुले आहे. याआधी अनेकदा या मुलांनी बालसुधार गृहातून पळ काढला होता.
बालसुधार गृहात सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यानं असे प्रकार घडतात. असं कारण या घटनेनंतर देण्यात आले आहे. याआधी देखील हेच कारण पुढं करण्यात आले होते. मात्र, या परिस्थितीत अद्याप कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. एकीकडे नागपूरमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असताना आता असे प्रकारही घडू लागल्यानं प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.