गरजू व बेरोजगारांना स्वावलंबनासाठी कौशल्य विकास कार्यक्रम महत्वपूर्ण-ना.बडोले

0
12

गोंदिया,दि.१० : कायमस्वरुपी नोकऱ्या हा विषय आज हद्दपार झाला आहे. सरकारी नोकऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. ग्रामीण व शहरी भागातील गरजू व बेरोजगार व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी कौशल्य विकास कार्यक्रम महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.आज १० एप्रिल रोजी सडक/अर्जुनी पंचायत समिती समोरील पटांगणावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे च्या वतीने आयोजित कौशल्य विकास मार्गदर्शन व रोजगार मेळाव्याचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ.परिणय फुके, आमदार संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती कविता रंगारी, सडक/अर्जुनी नगराध्यक्ष रिता लांजेवार, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.कृषी व पशूसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, गोरेगाव पं.स.सभापती दिलीप चौधरी, शारदा बडोले, बार्टीच्या कौशल्य विकास विभागाचे राज्य समन्वयक भुषण रामटेके, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, जि.प.सदस्य सर्वश्री शिला चव्हाण, माधुरी पातोडे, विश्वजीत डोंगरे, पं.स.उपसभापती विलास शिवणकर, पं.स.सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, उमाकांत ढेंगे, विजय बिसेन, डॉ.लक्ष्मण भगत, भरत क्षत्रीय, नगरसेवक शिव शर्मा उपस्थित होते.
बार्टीच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींच्या विकासासाठी व रोजगारासाठी काम करण्यात येत आहे. मागील वर्षी पुणे, मुंबईकडील ३४ मुलींची एअर होस्टेस म्हणून नियुक्ती झाली. यावर्षी नागपूर व गोंदिया जिल्ह्यातील ४ मुली एअर होस्टेस झाल्या आहेत. आता यावर्षी ५० मुलींना एअर होस्टेसचे प्रशिक्षण देण्यात येईल.
बार्टीच्या माध्यमातून राज्यातील ३० हजार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, या मेळाव्यात जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना वर्षभरात प्रशिक्षण देवून तसेच त्यांना प्लेसमेंट सुध्दा देण्यात येईल. जिल्हा कौशल्य विकास समितीच्या माध्यमातून ५०० ते १००० सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून त्यांना सुध्दा प्लेसमेंट देवून रोजगाराभिमुख करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जे उद्योग उभारणार आहेत त्यांना उद्योगाबाबतचे प्रशिक्षण व ज्ञान असले पाहिजे अशी अट टाकण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
डॉ.फुके म्हणाले, ग्रामीण भागातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी कौशल्य विकास मार्गदर्शन व रोजगार मेळावा उपयुक्त ठरला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजु व बेरोजगार युवकांना निश्चितच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी फक्त मनाची प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक आहे. २०२० पर्यंत भारत हा तरुणांचा देश म्हणून नावारुपास येणार आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे नवेगावबांध व नागझिरा अभयारण्याचा विकास करण्यात येत आहे. काम करणाऱ्या महिलांसाठी ज्याप्रमाणे वसतिगृह उपलब्ध करुन देण्यात आली आहे त्याप्रमाणेच काम करणाऱ्या पुरुषांसाठी देखील वसतिगृहे बांधण्यात यावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.जिल्हाधिकारी काळे म्हणाले, आज जग बदलत चालले आहे. जीवन उज्वल करायचे असेल तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणे विद्यार्थ्यांना आवश्यक झाले आहे. शासनाने कौशल्य विकासाचा कार्यक्रम सुरु केला आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ बेरोजगार व गरजु व्यक्तींनी घ्यावा. जिल्ह्याचा आराखडा तयार करुन विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ढाबरे म्हणाले, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत. त्या योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचत नाही. शासनाच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी यासाठी बाटीमार्फत कौशल्य विकास मार्गदर्शन व रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गृह उद्योगांना आता कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशाप्रकारच्या रोजगार मेळाव्याच्या आयोजनातून ग्रामीण भागातील बेरोजगारांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. लावण्यात आलेल्या विविध स्टॉलच्या माध्यमातून आवश्यक त्या प्रशिक्षणाचे अर्ज विद्यार्थ्यांनी भरुन दिले व विविध प्रशिक्षणाविषयी माहिती जाणून घेतली. विविध स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अर्थशास्त्र विषयावर प्रफुल पवार, चंद्रपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त श्री.राठोड व करिअर प्लॅनिंगबाबत शैली गंभीर, उद्योजकता बाबत आनंद खडतकर यांनी मार्गदर्शन केले.
कौशल्य विकास मार्गदर्शन व रोजगार मेळाव्यात बार्टी, टॉप्स् ग्रुप्स, थिंक स्कील, इंफोनेट, जावेद हबीब, बँक ऑफ इंडिया, रुस्तमजी ग्लोबल एजंसी, आय.बी.पी.एस.वर्धा, भंडारा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा यांच्यासह फ्युचर शार्प स्कील्स, सुखकर्ता इंजिनियरींग क्लस्टर पुणे, महाराष्ट्र स्टेट स्कील डेव्हलपमेंट सोसायटी, बी-एबल, क्वीज कॉर्पोरेशन, हिंदूस्थान लॅटेक्स फॅमिली प्लॅनिंग प्रमोशन ट्रस्ट, ज्ञानदा इन्स्टीट्यूट ऑफ प्लो पायपींग टेक्नॉलॉजी, युवा परिवर्तन गोंदिया, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, महारारष्ट्र सेंटर फॉर इंटरपीनरशिप डेव्हलपमेंट, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा माहिती कार्यालय, खादी व ग्रामोद्योग मंडळ, कृषी विभाग, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेले महामंडळे, आरव्हीएस एज्युकेशन ट्रस्ट, माविमचे आधार लोकसंचालीत साधन केंद्र, रमाबाई व लक्ष्मी महिला बचतगट डोंगरगाव, ओरियन एज्युटेक, बार्टी आयबीपीएस, आरोग्य विभाग, कविरा सोल्यूशन, सामाजिक न्याय विभाग, जागृती महिला बचतगट, नागझिरा स्वयंसहायता बचतगट, शेतकर्णी, जागृती, महासरस्वती महिला बचतगट आदींचे स्टॉल प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा चित्ररथ यामध्ये लावण्यात आला होता.
कार्यक्रमाला गोंदियाचे उपविभागीय अधिकारी अनंत वालसकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.खडसे, तहसिलदार विठ्ठल परळीकर, गोरेगाव तहसिलदार कल्याणकुमार डहाट, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बार्टीचे अधिकारी व कर्मचारी, समाजकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच समतादूत यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक बार्टीच्या निबंधक रुपाली आवळे यांनी केले. संचालन रवि वरके आणि रजनी गायधने यांनी संयुक्तपणे केले. उपस्थितांचे आभार समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी मानले.